Pune News : झेरॉक्सच्या पैशांच्या वसुलीसाठी ईडीलाच नोटीस; ॲड. असीम सरोदे यांनी पाठवली नोटीस, भोसरीतील भूखंड प्रकरण

पुणे : भोसरी येथील भूखंड प्रकरणात कागदपत्रे पाठविण्याची मागणी करून ते घेण्यासाठी आलेला व्यक्ती रिकाम्या हातीच गेल्याने झेरॉक्सच्या पैशांची करणारी नोटीस ॲड. असीम सरोदे यांनी सक्त वसुली संचालनालयास (ईडीलाच) पाठवली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांत चौकशीबाबत नोटीस आल्यानंतर अनेकांची धडकी भरते. त्याच ईडीलाच ॲड. असीम सरोदे यांनी एक हजार ४४० रुपयांच्या वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. भोसरी औद्योगिक वसाहतीतील भूखंड खरेदी प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे आले आहे. या प्रकरणात अंजली दमानिया यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्यावतीने ॲड. सरोदे बाजू मांडत आहेत. या प्रकरणातील अनेक कागदपत्रे ॲड. सरोदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासासाठी ती कागदपत्रे ईडीला चौकशीसाठी हवी होती. त्यामुळे ईडीचे सहायक संचालक राजेश कुमार यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी ॲड. सरोदे यांच्याकडे फोनवरून कागदपत्रांची मागणी केली होती. त्याबाबतचा मेल ईडीच्या कार्यालयातून पाठवण्यात आला होता. त्यानंतर ईडीने पाठवलेला व्यक्ती ॲड.

सरोदे यांच्या कार्यालयात आला मात्र त्याने कागदपत्रे नेलेच नाहीत. माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहे. म्हणून मी कागदपत्रे घेऊन जाऊ शकत नाही, असे कारण त्याने त्यावेळी दिल्याचे ॲड. सरोदे यांनी स्पष्ट केले होते. याबाबत ईडीच्या सहायक संचालकांना नोटीस पाठवून ॲड. सरोदे यांनी नाराजी नोंदवली होती. ईडी ही नामवंत शासकीय संस्था असून त्यांनी अनधिकृत व्यक्तीमार्फत महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करणे चुकीचे आहे. तसेच या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी आलेला खर्च देण्याची तसदीही ईडीने घेतलेली नाही. आम्ही समाजातील वंचित घटकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देतो. त्यामुळे व्यावसायिक कामातून मिळणारे शुल्क महत्त्वाचे असते. त्यामुळे भूखंड प्रकरणाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी झालेला खर्च ईडीने द्यावा, अशी मागणी नोटीसमध्ये करण्यात आल्याचे ॲड. सरोदे यांनी सांगितले.