Pune News : अनलॉकनंतर विवाहनोंदणी अर्ज संख्या वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन उठविल्यापासून विवाहनोंदणी करण्यासाठी दैनंदिन अर्जांची संख्या वाढत आहे. मागिल वर्षी कोरोना कालावधीमधील लॉकडाऊनमुळे विवाह नोंदणीवर मोठा परिणाम झाला आहे. 24 मार्च ते जून दरम्यान काही दिवस विवाहनोंदणी कार्यालये बंद होती. या कालावधीत अनेकांच्या नोकरी-व्यवसायावर मोठे संकट आले. त्यामुळे विवाहासारख्या पवित्र कार्यावर मोठा परिणाम झाला आहे. पत्रिका आणि मुहूर्त पाहून विवाह करण्याकडे आजही अनेकांचा कल आहे. त्याचबरोबर नोंदणी पंदधतीने विवाह करण्यासाठी संख्या वाढत आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त शहर आणि परिसरात राज्य-परराज्यातून आलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करीत आहे. या कार्यालयात नोंदणी करून होणारे विवाह विशेष विवाह कायद्यानुसार होतात. त्यामध्ये जात, धर्माचा अडथळा नसतो. विवाहाच्या वेळी किचकट प्रक्रिया नसल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी उपस्थितांची संख्या नियंत्रित केली, हीसुद्धा एक जमेची बाजू आहे. त्यामुळेही नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१९ मध्ये ७०४६ नोंदणी विवाह झाले होते. गेल्या वर्षी ५२२१ विवाह नोंदणी पद्धतीने विवाह केला. लॉकडाऊनमध्ये नोंदणीची संख्या कमी होती. त्यामुळे यंदा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे विवाह नोंदणी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अनलॉकनंतर नोंदणी पद्धतीच्या विवाहाबरोबर पारंपरिक पद्धतीनेही धुमधडाक्यात विवाह करण्यात येत आहेत. नोंदणी पद्धतीमध्ये शासकीय नियमांचे पालन करीत असल्याने खर्चाची बचत होते. तर पारंपरिक पद्धतीमध्ये शासकीय नियमांना हरताळ फासला जात आहे. जेवणावळी, तसेच इतरही डामडौल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे लग्नाचा खर्च वाढत आहे. धुमधडाक्यात लग्न होऊ लागल्यामुळे कापड, फर्निचर, भांडी, मांडव, वाजंत्री, बँड, भटजी आदींना चांगले दिवस आले आहेत. या व्यवसायामधील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

गेल्या दोन वर्षांतील 2019 आणि 2020 नोंदणी विवाह : जानेवारी ५६७, ६८६, फेब्रुवारी ६७०, ७३५, एप्रिल ५८५, ०. मे ७५१, ८४, जून ६४८, १९९, जुलै ५३५, ३८३, ऑगस्ट ४६६, ४३१, सप्टेंबर ४००, ४२९, ऑक्टोबर ५०३, ५४४, नोव्हेंबर ६४०, ५६२, डिसेंबर ७४०, ८३२, अशी एकूण ७०४६ आणि ५२२१ नोंदणी झाली आहे.