Pune News : पोटच्या 13 वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे; पित्याला 5 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोटच्या तेरा वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या ४६ वर्षीय बापाला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला.

१४ जून २०१४ आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्याच्या कालावधीत ही घटना घडली. संबंधित मुलीच्या आईनेच याबाबत कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी या कोथरूड परिसरात त्यांचा पती, दोन मुली आणि मुलासह राहात. त्यातील सर्वात लहान मुलीवर अत्याचार झाले आहेत. फिर्यादी या घरकाम करतात. रात्रीच्या वेळी आणि पत्नी घरी नसल्याचा फायदा घेत तो मुलीसोबत अश्‍लील चाळे करीत. तिला घरीच थांब असे म्हणत असत. फिर्यादीला तीन महिन्यापासून वडिलांचा मुलीसोबत वागण्यातील वेगळेपणा जाणवला. त्यावेळी विश्‍वासात घेऊन तिने पीडितेला याबाबत विचारणा केली.

यावेळी घडलेला प्रकार समोर आला. त्यावेळी फिर्यादी यांनी एका एनजोआच्या मदतीने पोलिसात फिर्याद दिली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले.