Pune News : व्हॅलेंटाईन डेच्या पुर्व संध्येला त्यानं I LOVE YOU म्हणत हातावर करून घेतले वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात महाविद्यालये सुरू नसली तरी तरुणाई मात्र “व्हॅलेंटाईन” विक दणक्यात सुरू असताना एका प्रेम वेड्या तरुणाने तिला “आय लव्ह यु” म्हणत हातावर वार करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
इस्माईल रियाज शेख (वय 21) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहण्यास असून, एकमेकांना ओळखतात. तरुणी येथील एका महाविद्यालयात सध्या शिक्षण घेत आहे. तर आरोपी काहीच करत नाही. तो नेहमी फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून त्रास देत असे. दरम्यान गुरुवारी सकाळी ही तरुणी महाविद्यालयात जाण्यास निघाली. येथील एका बस स्टॉपवर थांबली. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने तिला ‘आय लव्ह यु’ म्हणाला, परंतु तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. यामुळे इस्माईल याने हातावर सुरा मारून हात कापून घेतला. यामुळे तरुणी घाबरली होती. ती निघून गेली आणि पालकांना हा प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली. याघटनेत तो किरकोळ जखम झाली आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करीत आहेत.