Pune News : कोंढव्यात ‘ब्लॅक मॅजिक’च्या नावाखाली पैसे उकळणारा भोंदूबाबा 12 तासात गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तुमच्या घरावर काळी जादु करणी झाली असल्याचे सांगून घरांच्या जीवाची भिती दाखवून इलाजाकरीता हरणाची कस्तुरी, धान्य आणून आघोरी विद्येसाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार कोंढव्यात उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबाला बारा तासांच्या आत अटक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते 14 जानेवारी 2021 दरम्यान कोंढव्यातील शिवनेरीनगर येथे घडला आहे.

नईम मुस्तकीम सिद्दीकी (वय ४८, रा. हारुन मंजील, जीवनबाग, मुंब्रा, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि.18) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी शिवनेरीनगरमधील एका 32 वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पोलिसनामाला सांगितले की फिर्यादी यांची पत्नी गेल्या 6 वर्षांपासून वारंवार आजारी पडत होती. तिच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले तरी फरक पडत नव्हता. फिर्यादी यांच्या भावाने ही बाब त्यांच्या एका मित्राला सांगितली. त्याने नईम सिद्दिकी हा उपचार करीत असून तो नारळ फोडून उपचार करतो असे सांगितले. दिवाळीच्या सुमारास नईम सिद्दिकी हा फिर्यादीच्या घरी आला व त्याने नारळ फोडला. तो फोडल्यानंतर त्या नारळातून केस, लाल कापड, मटणाची चरबी, लिंबु या गोष्टी निघाल्या. त्यावेळी नईम सिद्दीकी याने फिर्यादी याच्या पत्नीच्या छातीत गाठ, मणक्यात दुखणे आहे असे सांगितले. तसेच पॉयझनचा त्रास असे सांगितले.

हा त्रास तुमच्या घरावर कोणीतरी करणी, काळी जादु केली असल्यामुळे होत असल्याचे नईमने सांगितले. त्यावर उपाय म्हणून त्याने हरणाची कस्तुरी, मातीची हांडी, 7 प्रकारचे धान्य, लिंबु , अगरबत्ती, मोहरी, लाल मिरची असे 15 प्रकारचे साहित्य लागेल, असे सांगितले. हरणाची एक तोळे कस्तुरीसाठी 35 हजार रुपये प्रमाणे घरातील तीन व्यक्तींचे पुजेसाठी 3 तोळे कस्तुरीसाठी त्याने 1 लाख 5 हजार रुपये लागतील, असे सांगितले होते. त्याप्रमाणे नईम याने पुजा केली. अशाच प्रकारे नईम सिद्दिकी याने आणखी एकाच्या घरी जाऊन पुजा करुन त्यांच्याकडून 40 हजार रुपये घेतले. पण पुजा करुनही फिर्यादी यांच्या पत्नीच्या तब्येतीत फरक पडला नाही. तेव्हा त्याने आणखी 2 कस्तुरी लागतील, असे सांगितले. तेव्हा फिर्यादी यांना संशय आला.

त्यानंतर त्यांच्या भावाच्या ओळखीच्या एका कुटुंबाकडे नईम सिद्दिकी गेला. त्यांना तुमची साडेसाती सुरु आहे. त्यांना कधीही मुले होणार नाही, असे सांगितले. परंतु त्यांचे लग्न झाले असून अगोदरच दोन मुले झालेली आहेत. त्यामुळे नईम हा हातचलाखी करुन काळ्या जादुच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्याने फिर्यादी यांच्याकडून 1 लाख 15 हजार व अन्य तिघांकडून 40 हजार, 80 हजार व 35 हजार रुपये असे 2 लाख 70 हजार रुपये घेतले. हे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी नईमकडे पैसे परत मागितल्यावर त्याने फिर्यादीच्या खात्यात 1 लाख रुपये ट्रान्सफर केले. उरलेले पैसे पत्नी घेऊन येत असल्याचे सांगितले. परंतु, त्याची पत्नी आली नाही. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी अवघ्या बारा तासात त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.