Pune News : इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे विहीरीचे पाणी वापरावरुन एकाचा खून, 2 आरोपींना अटक

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतातील विहिरीचे सामाईक पाणी वापरण्यावरुन झालेल्या वादातून दोन पुतण्यांनी चुलत्याचा डोक्यात खोऱ्याने मारहाण करुन खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव येथे सोमवारी (दि.1) घडली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत शेजारचा एक बांधकरीही सामील असल्याचे फिर्यादीत म्हटले असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

महाविर जयकुमार देवळकर (वय-54 रा. भगतवाडी, ता. इंदापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. समाधान अनिल देवळकर, शुभम अनिल देवळकर व रामदास सिद्धु फडतरे (सर्व रा. भगतवाडी, ता.इंदापूर, जि.पूणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर यातील समाधान व शुभम देवळकर यांना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुवर्णा महाविर देवळकर (वय-45 रा. भगतवाडी, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींना अटक करून इंदापूर न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवार (दि. 6 मार्च) पर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी व फिर्यादी यांची शेतजमीन इंदापूर तालुक्यातील निरनिमगाव गावचे हद्दीत एकमेकांचे शेजारी असुन अटक आरोपीं हे फीर्यादींचे पुतणे आहेत. तर रामदास फडतरे हा बांधकरी आहे. फिर्यादींचे पती व अटक आरोपी यांच्यामध्ये शेतातील सामाईक विहीरीतील पाणी वापरण्यावरून वारंवार वाद होत होते. मागील पंधरा दिवसापूर्वी फिर्यादींचे पती व आरोपी यांच्यामध्ये याच कारणावरून वाद झाला होता.त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांचे पतीला दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर शेजारील बांधकरी रामदास फडतरे यांनीही शेतीच्या वादातुन फिर्यादींचे पतीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सोमवारी (दि. 1) फिर्यादी यांचे पती हे सायंकाळी रानातील गवत काढण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मंगळवारी (दि.2) सकाळी फिर्यादी यांचा मुलगा वडीलांना पाहण्यासाठी रानात गेला असता, वडील हे रानात हरभर्‍याचे रानात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. मुलाने घरी जावून घटनेची माहीती दिली. घरच्यांनी रानात जाऊन पाहिले असता महाविर देवळकर हे मृतावस्थेत आढळून आले. महाविर यांच्या पत्नीच्या तक्रीरीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.