Pune News : पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सची 1 कोटी 60 लाखाची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक पी. एन. गाडगीळ यांना त्यांची शाखा चंदीगड येथे दुकान टाकण्यासाठी व त्यासाठी ५० कोटींचे कर्ज मिळवून देण्यासाठी १ कोटी ६० लाख ५० हजारांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2018 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43, रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंजाब येथील रोहितकुमार शर्मा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रोडवर फिर्यादी यांचे पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स हे दुकान आहे. शहरातील सराफ दुकानांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पैकी एक हे दुकान आहे. दरम्यान 2018 मध्ये आरोपी शर्मा हा फिर्यादी यांच्या दुकानात आला होता. त्याने फिर्यादी यांच्याशी बोलणे करत त्यांना चंदीगड येथे एक शाखा उघडू त्याठिकाणी व्यवसाय करू शकतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना शाखा उघडण्यासाठी त्यांना 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून कर्ज मिळवण्यासाठी म्हणून वेळोवेळी 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपये घेतले.

मात्र त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. तसेच त्यांचे पैसे देखील परत केले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट एक करत आहेत.