Pune News : ‘सिरम’मधील आगीचा समांतर तपास गुन्हे शाखेकडे, घटनास्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –सिरम मध्ये लागलेल्या आगीचा समांतर तपास गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सिरममध्ये आगलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सिरमच्या नवीन इमारतीमध्ये आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आग लागल्याची माहिती समजल्यानंतर पुण्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या प्रमुखांनी घटनास्थळी धाव घेतली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आगीत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रामा शंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघे रा. उत्तरप्रदेश), सुशिल कुमार पान्डे (रा. बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतिक पाशेटे (दोघे रा. पुणे) अशी आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सिरममध्ये आग नेमक्या कोणत्या कारणामुळं लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतची माहिती घेण्याचं काम युध्दपातळीवर चालू आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपास हडपसर पोलिस करीत असले तरी गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. दरम्यान, रात्री आठ वाजता घटनास्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत.