Pune News : शुक्रवारपासून परिवर्तन वादी साहित्य संमेलनाचे आयोजन, दोन दिवस चालणार महोत्सव

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित परिवर्तनवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाचे उदघाटन शुक्रवार दि ८ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. आनंदराव पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार व महापौर मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आझम कैंपस
एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सकाळी १०.३० वाजता परिवर्तन दिडी काढण्यात येणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता डॉ. मनोहर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिवर्तनवादी साहित्य आणि परिवर्तनाच्या चळवळी’ या विषयावरील परिसंवादात सुभाष वारे, डॉ. माधवी खरात, डॉ. नीलम गोर्हे, डो. विनोद शिरसाट, वि. दा. पिगळे आणि उद्धय कानई सहभागी होणार आहेत.

शनिवार दि ९ रोजी सकाळी ११.०० वाजता, डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘समाज परिवर्तन आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात सम्राट फडणीस, पराग करंदीकर, विजय बाविस्कर, मुकुंद संगोराम, अरूण निगवेकर आणि सुनील माळी हे पत्रकार सहभागी होणार आहेत.संध्याकाळी ५.३० वाजता ‘भारतीय संविधान आणि आजचे राजकारण’ या विषयावरील परिसंवादाला राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून या परिसंवादात डॉ विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.

या संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन साहित्य संमेलन पुरस्काराचे वितरण सिंबायोसिसचे फुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कामगार नेते डॉ. बाबा आढाव, सहकार क्षेत्रासाठी मिलिंद काळे, ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, शैक्षणिक कार्यासाठी रणजित दिसले, सामाजिक कार्यासाठी सुनील चव्हाण आणि अरुण छाब्रिया यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे धिवार यांनी सांगितले.