Pune News : पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्याने ‘या’ तारखेपासून खुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील सर्व उद्याने बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने पुणे महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्याने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 81 उद्याने खुली करण्यात आली आहे. त्यामध्ये 60 उद्याने 25 जानेवारी पासून शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खुली करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत.

या अटींवर खुली होणार उद्याने

– उद्याने सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 8 या वेळेत सुरु राहतील

– उद्यानामध्ये सोशल डिस्टन्सींग व सॅनिटेशन बाबत मार्गदर्शक सूचना/नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

– नागरिकांना उद्यानामध्ये सामाजिक, सुरक्षित अंतर ठेवून वैयक्तिक व्यायाम जसे धावणे, चालणे याशिवाय अन्य इतर बाबींना परवानगी नसेल

– सामुदायिक स्वरुपात उद्यानाचा वापर करण्यात येणार नाही. हास्य क्लब, योगा, शुटींग व इतर सामुदायिक, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही.

– उद्यानामध्ये गर्दी होणार नाही तसेच जीम साहित्य, खेळणी, हिरवळ, बेंचेस इत्यादीचा वापर नागरिकांनी करु नये.

उद्यानामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मास्क बंधनकारक

– उद्यानामध्ये पान, तंबाखू खाणे व थुंकणे याला सक्त मनाई

– 10 वर्षाच्या आतील आणि 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गरोदर महिला यांना उद्यानात प्रवेश नाही.

– नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास उद्यान तात्काळ बंद केले जाईल.