धक्कादायक ! हॉस्पीटलमधील बेडसाठी पुण्यातील अलका चौकात आंदोलन करणाऱ्या ‘त्या’ रुग्णाचा अखेर मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना बेडसाठी शहरातील रुग्णालयांमध्ये फिरावे लागत आहे. बेड मिळावा यासाठी आता रुग्णांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. वेळेवर बेड मिळाला नसल्याने अलका चौकात आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा अखेर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील 7-8 दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्याने धायरीतील एका तरुणाने काल रात्री कुटुंब आणि मित्रांसह अलका चौकात ठिय्या आंदोलन केले होते.

आदोलनानंतर या रुग्णाला विश्रांतवाडी येथील एका रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. मात्र, त्या रुग्णाचा आज दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोज कुंभार असं या रुग्णाचं नाव आहे. त्याला निमोनियाचा त्रास होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितलं. तो धायरी परिसरातील रहिवासी आहे. त्रास वाढल्याने नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुपारी एक वाजल्यापासून नातेवाईक रुग्णवाहिकेसह वेगवेगळ्या रुग्णालयात चकरा मारत होते.

मात्र, अनेक ठिकाणी जाऊन आल्यावर देखील त्याला बेड उपलब्ध झालाच नाही आणि त्यामुळे अक्षरश: कंटाळलेल्या रुग्णाने अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं. रुग्णासह संतप्त नातेवाईक देखील अलका चौकात बसून होते. मात्र रात्री उशिरा विश्रांतवाडीच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर नातेवाईकांची समजूत काढून त्यांना तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आला होता. पण वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाला आपला जीव गमावावा लागला.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. अनलॉक नंतर पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे. एका आठवड्यात कडक लॉकडाऊन करूनही रुग्णांची वाढ कमी झालेली नाही.