Pune News : मार्केटयार्ड येथील ‘या’ रत्यावर लवकरच ‘पे अँड पार्क’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  मार्केट यार्ड येथील शिवनेरी रस्ता अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने चंग बांधला आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फळ विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी अतिक्रमण शुल्क आकारणीच्या कारवाईला विरोध झाल्यानंतर आता समितीने या संपूर्ण रस्त्यावर ‘पे अँड पार्क’ करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

गुलटेकडी येथील मार्केटयार्ड समोरील शिवनेरी रस्ता बाजार समितीच्या मालकीचा आहे. परंतु नागरी वापरासाठी देखभाल दुरुस्तीच्या अटीवर महापालिकेच्या ताब्यात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली आहेत. पूर्वी गणेशोत्सव आणि सणासुदीला दिसणारे फुलं, फळ विक्रेते आता बाराही महिने या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटू लागली आहेत. या रस्त्यावरून राज्य, परराज्यातुन येणारे ट्रक तसेच स्थानिक टेम्पो, दुचाकींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अतिक्रमणामुळे कायमच वाहतूक कोंडी तसेच छोटे अपघात होतात. वरचेवर कारवाई करून देखील अतिक्रमनांवर फारसा परिणाम होत न्हवता.

या पार्श्वभूमीवर बाजार समितीने महिन्याभरापूर्वी रस्त्याच्या कडेला अनधिकृत पथारी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडून दररोज 500 रुपये अतिक्रमण शुल्क आणि जीएसटी आकारायला सुरुवात केली. या विरोधात पथारी पंचायतिने मोर्चा व उपोषण केले. कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलने झाली. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरती ही मोहीम स्थगित केली.

परंतु अल्पावधीतच प्रशासनाने रस्ता अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी पुढचे पाऊल उचलले आहे. शिवनेरी रस्त्यावर ‘ पे अँड पार्क ‘ योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

यासंदर्भात बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे. गरड म्हणाले की, शिवनेरी रस्त्यावर हॉटेल उत्सव पासून 50 मी. अलीकडे आणि वखार महामंडळ चौकापासून 50 मी. अलीकडे अशा मधल्या टप्प्यातील शिवनेरी रस्त्यावर दुतर्फा ‘ पे अँड पार्क ‘ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि महापौर यांच्या अध्यक्षतेखालील समितिकडे पे अँड पार्क साठी एनओसी साठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्या परवानगीनंतर शिवनेरी रस्त्यावर पे अँड पार्क राबविण्यात येईल. काही भागात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी हे पार्किंग असेल. या रस्त्यावर पार्किंगचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहील. यातून शिवनेरी रस्त्यावर वाहतुकीला शिस्त लागेल आणि बाजार समितीलाही उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण होणार आहे.