Pune News : पीडीसीए, पीवायसीची विजयी सलामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पीडीसीए आणि पीवायसी हिंदू जिमखाना अकॅडमी या संघांनी महिला प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

धीरज जाधव क्रिकेट अकॅडमीने बारामतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेली स्पर्धा गुरुवारपासून सुरु झाली. उदघाटनाच्या सामन्यात कर्णधार पार्वती बाकळे हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पीडीसीए (पुणे जिल्हा क्रिकेट संघटना) संघाने सारा क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचे कडवे आव्हान तीन चेंडू राखून परतावून लावले. साराने 5 बाद 134 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या आव्हानासमोर पीडीसीएला संघर्ष करावा लागला होता. अंतिम टप्प्यात पार्वतीने स्वाती शिंदे आणि श्रुती भांबुर्डेकर यांना प्रत्येकी दोन चौकार मारले आणि विजय आवाक्यात आणला. साराच्या श्रुती भांबुर्डेकरने सलामीला येत नाबाद अर्धशतकी खेळी करीत लक्षवेधी कामगिरी नोंदविली.

दुसऱ्या सामन्यात पीवायसीने एकतर्फी सामन्यात श्री स्वामी समर्थ क्रिकेट अ‍ॅकॅडमीवर आठ राखून दणदणीत विजय मिळविला. स्वामी समर्थ अ‍ॅकॅडमीचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय अपयशी ठरला. अखेरच्या षटकापूर्वी त्यांचा डाव 72 धावांत आटोपला. ऑफस्पीनर श्रावणी शिंत्रे हिने 14 धावांत चार विकेट घेतल्या. पीवायसीकडून मनाली कुलकर्णी-प्रगती धावडे यांनी 59 धावांची सलामी देत विजय औपचारीक ठरविला.

त्याआधी आमदार रोहित पवार यांच्याहस्ते आणि बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिक्षक नारायण शिरगावकर यांच्या मुख्य उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले.

रोहित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नेते शरद पवार यांच्या प्रेरणेतून हे स्टेडियम उभारण्यात आले असून त्याच्या विकासासाठी आदरणीय नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढाकार घेत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या क्लबमध्ये गुणी खेळाडूंना लवकर संधी मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी उच्च दर्जाची सुविधा आणि अनुभवी खेळाडूचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी धीरज जाधव यांनी पुढाकार घेतला आणि त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो.

माजी रणजीपटू धीरज जाधव यांनी सांगितले की, लॉकडाउनमुळे सर्वच क्रीडापटूंना फटका बसला. त्यांना स्पर्धात्मक पातळीवरील खेळाला मुकावे लागले. आता परिस्थिती हळूहळू पुर्ववत होत असताना विविध वयोगटांमधील स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी आम्ही अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. महिलांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामने मुळातच कमी होत असताना अशी स्पर्धा आयोजित करणे विलक्षण समाधान देणारे आहे. खास करून महिलांची या पातळीवरील स्पर्धा बारामतीमध्ये प्रथमच घेणे जास्त महत्त्वाचे वाटते.