Pune News : वैकुंठातील प्रलंबित कामे तीन महिन्यात पूर्ण करणार – आमदार मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैकुंठ स्मशानभूमीतील सर्व प्रलंबित कामे तीन महिन्यात पूर्ण करु असे आमदार मुक्ता टिळक यांनी सांगितले.आत्ता याठिकाणी मांडण्यात आलेल्या तक्रारींची मी गांभीर्याने दखल घेतली असून त्याचा पाठपुरावा करुन प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी करुन ही कामे पूर्ण केली जातील, माझे सहकारी प्रमोद कोंढरे, राजू परदेशी हे शैलेश लडकत यांच्याशी समन्वय साधून सर्व विषय मार्गी लावतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक महेश लडकत यांच्या प्रथम मासिक स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प सोडला जावा यासाठी वैकुंठ परिवाराच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, नगरसेविका स्मिताताई वस्ते, महेशरावांचे बंधू शैलेश लडकत, भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा सरचिटणीस राजू परदेशी, उद्यम बॅंकेचे संचालक शिरीष कुलकर्णी, दिनेश गांधी, सीताराम खाडे, मनोज नायर, पतित पावन संघटनेचे दिनेश भिलारे यांच्यासह सर्व कर्मचारी, गुरुजी व महेश लडकत यांचे स्नेही उपस्थित होते.

वैकुंठातील प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि येथे येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे हीच महेश लडकत यांना समर्पक श्रद्धांजली ठरेल असे संदीप खर्डेकर म्हणाले. वैकुंठातील कामां बाबत महेशरावांशी वारंवार चर्चा होत असे त्यांनी त्यांच्या व खासदार गिरीश बापट यांच्या निधीतून अनेक कामे मार्गी लावली, मात्र त्यांच्या नियोजनातील अनेक अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करणे हे खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृती जागविण्यासारखे होइल असेही ते म्हणाले.

उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे व नगरसेविका स्मिताताई वस्ते यांनी सर्व समस्यांची पाहणी करुन महेश लडकत यांची वैकुंठातीलच नव्हे तर प्रभागातील प्रलंबित कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे वचन दिले व येथे महेशरावांनी केलेले कार्य आम्ही पुढे नेउ असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व कर्मचारी व गुरुजींनी विविध समस्यांचा पाढा वाचला.