Pune News : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह मोटारीतून जंगी मिरवणुक काढणार्‍या गुंड गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी रोजी गजानन मारणे याची तळोजा कारगृहातून सुटका झाल्यावर त्याच्या समर्थकांनी शेकडो गाड्यांमधून त्याची जंगी मिरवणुक काढली होती. या काळात एक्सप्रेस हायवेवरुन पुण्याकडे येताना मारणेच्या सर्व समर्थकांनी आपल्या गाड्यांचे  साईड लाईट चालू ठेवून जोरात घोषणाबाजी केली होती. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारा पवना पुल ते चांदणी चौक या दरम्यान बंगलुरु – मुंबई हायवे रोडने तळोजा कारागृहातून सुटलेला गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे (रा. कोथरुड) हा त्याच्या पांढर्‍या रंगाच्या गाडीमधून प्रवास करुन त्याने त्याच्या गाडीच्या आजू बाजूला सुमारे 100 ते 150 समर्थकासह 30 ते 35 चारचाकी गाड्या चालवून, गाड्यांचे बाहेर प्लॅटफार्मवर धोकादायक पद्धतीने उभा राहून, गाड्यांमधून अर्धवट शरीर बाहेर काढून, रस्त्याच्या कडेला होऊन गाड्या थांबवून सार्वजनिक रस्त्याने मुंबईकडून बंगलुरुकडे जाणार्‍या वाहनचालकांना त्यांचा हक्क असताना त्यापासून वंचित ठेवले. दहशतीच्या जोरावर वंचित ठेवून घोषणाबाजी करुन इतर वाहनचालकांना पुढे जाऊ न देता, वाहनचालकांना शिवीगाळ करुन दहशत निर्माण करीत चारचाकी वाहनाने प्रवास करीत असताना दिसून आले. आम्ही वरील वाहनचालकांना थांबवण्याचा इशारा केला असता न थांबता निघून गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील गणपती मंदिरात विना परवानगी 150 ते 200 समर्थकांना जमवून गणपतीची आरती करुन कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गजानन मारणे व त्याच्या 9 समर्थकांना अटक करुन न्यायालयात हजर केले होते. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा मारणे विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.