Pune News : ‘अब आया ‘उंट’ पहाड के निचे’ ! विरोधक ‘घास’ घालणार ?

पुणे (Pune ) – महापालिका निवडणुकीत जवळपास शंभर जागा जिंकून निर्विवाद बहुमताच्या जोरावर पालिकेत प्रथमच सत्तेत आल्याने जमिनी वरुन दोन अंगुळे वर धावणारा भाजपचा रथ शेवटच्या वर्षात जमिनिवर आला आहे. सुरुवातीला विरोधकांना कस्पटासमान लेखून पक्षनेत्यांच्या बैठकाही न घेणारे भाजप नेतृत्व आता अगदी ‘ अनौपचारिक ‘बैठका घेऊन विरोधकांची मनधरणी करताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या या अवस्थेबाबत ‘ अब आया उंट पाहाड के निचे ‘ असा विजयी भाव विरोधकांकडून व्यक्त होत नसेल तर नवलच.

महापालिकेत 2017 मध्ये अनेक दशकानंतर सत्तापरिवर्तन झाले. 162 सदस्यीय सभागृहात भाजपने 98 नगरसेवकांसह एकहाती सत्ता मिळवली. केंद्र, राज्य आणि पाठोपाठ महापालिकेतही निर्विवाद सत्ता मिळाल्याने भाजपचा रथ दोन अंगुळे जमिनिवरूनच धावत होता. बहुमताच्या जोरावर  विरोधकांना बाजूला ठेवून घोडदौड सुरू होती. विशेष असे की महापौरांच्या नेतृत्वाखाली धोरणात्मक मुद्द्यांवर एकमताने निर्णय घेणे, सर्वसाधारण सभा चालवणे यासाठी परंपरेने घेतल्या जाणाऱ्या पक्षनेते सभेची प्रथाही मोडीत काढली होती.  सभागृहात आणि सर्व समित्यांमध्ये बहुमत असल्याने विरोधकांची ‘ गरजच काय ? ‘ अशीच लाईन ऑफ ऍकशन ठरवण्यात आली होती.

परंतु तीन – चार वर्षातच राजकारणात ‘ समय बडा पैलवान होता है ‘ याची अनुभूती झाली. सर्व निर्णय सरळ होत असतील तर शहराचा विकास विनाअडथळे केंव्हाच झाला असता, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली असावी. अशातच राज्यात सत्तांतर होऊन विरोधक सत्तेत आल्याने डोळे उघडले असावेत, असाच ट्रेंड सत्ताधाऱ्यांच्या सध्याच्या वागणुकीवरून पाहायला मिळत आहे.

वर्षभरावर महापालिका निवडणूक आली आहे. राज्यातील सत्तेमुळे विरोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर चार वर्षांच्या कालावधीत शहराच्या विकासात फारशी चमक दाखवता न आल्याने सत्ताधाऱ्यांपुढे ‘ रात्र थोडी सोंग फार ‘ असा प्रश्न उभा राहिला आहे. अशातच सत्तेचा ‘साईड इफेक्ट’ भाजपला झाला असून भाजप नेत्यांमधील अंतर्गत वाद आणि नगरसेवकांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढीस लागल्याने डोकेदुखी वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वसनांची पूर्तता किंबहुना पायाभरणी करणे यासाठी सत्ताधाऱ्यांपुढे एकमेव पर्याय राहिला आहे तो म्हणजे विरोधकांची ‘ मनधरणी ‘ . स्थायी समिती असो वा अन्य समित्यांमध्येही विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव बाजूला ठेवणे, प्रस्तावात उपसुचनांद्वारे बदल करणे याला बहुमतातील सत्ताधारी प्राधान्यक्रम देऊ लागले आहेत. विकासकामांच्या समारंभात विरोधकांना ‘ जाणीवपूर्वक ‘ व्यासपीठ उपलब्द्ध करून दिले जात आहे. एवढेच काय पालिकेतच न्हवे तर पालिकेबाहेर  पक्षनेत्यांच्या ‘अनौपचारिक’ बैठका आणि चर्चा झडू लागल्या आहेत. निवडणुकांच्या तोंडावर ‘ सबका साथ सबका विकास ‘ चा अजेंडा राबवून ‘ उपरती ‘ झाल्याचे भासविण्यात येत असल्याने विरोधकांतही ‘ अब आया उंट पहाड के निचे ‘ अशी भावना निर्माण झाली आहे. परंतु भाजपच्या रणनीतिची एव्हाना चांगली जाणीव झालेले विरोधक या उंटाला ‘घास’ घालणार का ? हे पुढील वर्षभरात पाहायला मिळणार आहे.