Pune News : महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांचे लसीकरण ‘दुसर्‍या’ टप्प्यात होणार

पुणे, – कोरोनावरील लस दृष्टीपथात असताना लसीकरणासाठी नियोजन सुरू झाले आहे. केंद्राच्या गाईडलाईन्सप्रमाणे सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, औषध विक्रेत्यांना लस देण्यात येणार आहे. महापालिकेने यापुढे जावून कोरोना प्रतिबंधासाठी काम करणार्‍या महापालिकेच्या अन्य विभागातील अधिकार्‍यांपासून शेवटच्या कर्मचार्‍यांचे लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या आयुक्तांपासून, आरोग्य विभाग व अन्य विभागातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांनीच अथक परिश्रम घेतले आहेत. कोरोनाला प्रतिबंध करताना पाचशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी बाधित झाले असून ४० हून अधिकांचा मृत्यूही झाला आहे. केंद्र शासनाने कोव्हिड योद्ध्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच उतरविले आहे. परंतू या विमा कवचाच्या जाचक अटींमुळे क्वचितच एखाद दुसर्‍याच्या कुटुंबियांना या कवचाचा लाभ झाला. मात्र, महापालिकेने जाहिर केल्यानुसार कामगार कल्याण निधीतून मृत कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पावले उचलली आहे.

यापुढे जावून कोरोनाच्या लसीकरणासाठी आरोग्य विभाग वगळता सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ड्युटी केलेले अधिकारी, कर्मचारी, घनकचरा व व्यवस्थापन विभागाअंतर्गत कार्य करणारे कर्मचारी, कोव्हीड विषयक सेवेसाठी थेट संपर्कात असलेले अभियंता, महसुली व इतर विभागातील महापालिका कर्मचारी, वाहन चालक, पीएमपीचे बस चालक, कंडक्टर, वॉटर टँकर चालक, स्मशान भूमीत सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व विभागांना पत्र पाठवून संबधित अधिकारी, कर्मचार्‍यांचे नाव व संपर्क क्रमांकाची यादी पुढील दोन दिवसांत पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

कंत्राटी कर्मचार्‍यांचे काय?
कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या कर्मचार्‍यांसोबतच कंत्राटी कामगारांनीही चांगले काम केले आहे. यामध्ये अगदी कोव्हीड सेंटर्सच्या स्वच्छतेपासून तेथील व्यवस्थापनामध्ये कंत्राटी कामगारांनी जोखीम उचलून काम केले आहे. काही कंत्राटी कामगारांनाही कोरोनाची लागण झाली असून ७ हून अधिक कर्मचारी कोरोनाला बळी पडले आहेत. परंतू लसीकरणामध्ये तूर्तास तरी त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. कोरोना काळात आजही सेवा बजावत असलेल्या या कर्मचार्‍यांनाही लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.