Pune News : खराडी बायपास बीआरटी मार्गावर दुचाकीची पीएमपी बसला पाठीमागून धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील खराडी बायपास बीआरटी मार्गात पाठीमागून दुचाकीस्वाराने पीएमपी बसला धडक दिल्यानंतर तो बसच्या खाली अडकला आणि तितक्याच पीएमपीएल बसने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याघटनेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर आगीत बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने तात्काळ प्रवाशी बाहेर पडल्याने त्यांना काही झाले नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे.

अजिंक्य येवले (वय 25) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पीएमपीएल बस प्रवाशांना घेऊन खराडी बायपास चौकातून बीआरटी मार्गाने जात होती. त्यावेळी भरधाव वेगातील दुचाकीने पाठीमागून जोरात बसला धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, दुचाकी चालक तरुण बसच्या खाली गेला होता. त्यानंतर अचानक बसने पेट घेतला. यावेळी बस चालक व कंडक्टर यांनी तात्काळ प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

प्रवाशी धावतच खाली उतरले. पण तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. खाली अडकलेला दुचाकीस्वार यात गंभीर जखमी झाला होता. माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याच्या मार्शल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या दुचाकीस्वाराला बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या पेट घेतलेल्या बसला पाण्याचा मारा करून विझवले आहे. यात बस जळून खाक झाली आहे.