Pune News : खराडी बायपास रोडवर धावत्या PMPML बसने घेतला अचानक पेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील खराडी बायपास रोडवर एका धावत्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. या आगीत एक प्रवाशी जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पीएमपीएल बस प्रवाशांना घेऊन खराडी बायपास चौकातून जात होती. त्यावेळी इंजीन मधून अचानक धुर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ बस थांबवली आणि प्रवाशांना धूर येत असल्याची माहिती दिली. प्रवाशांची एकच धावपळ उडाली. पण तोपर्यंत बसने पेट घेतला. काही क्षणात आग मोठ्या प्रमाणात भडकली. या धावपळीत एक प्रवाशी किरकोळ जखमी झाला. नागरिकांनी ही माहिती अग्निशमन दल व विमानतळ पोलिसांना दिली. यानंतर अग्निशमन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान मात्र रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता. बसचा स्फोट होईल या भीतीने प्रवाशांनी व नागरिकांनी पळ काढला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत काही वेळात या आगीवर नियंत्रण मिळवले.