Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार भामट्याला ग्रामीणच्या ATS कडून अटक

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन – शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रुपयेची फसवणूक करणाऱ्या गोपनीय बातमीदार भामट्याला पुणे दहशतवादी पथक पोलिसांनी  अटक केली असल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांनी  दिली आहे.

याबाबत सिकंदर परमेश्वर राम (रा. मुंबई)  याला पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याचे तीन साथीदार माञ फरार झाले आहेत. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रांजणगाव (ता. शिरूर) येथे फॅक्टरी सदृश पत्र्याच्या एका गोडावूनमध्ये 100 कोटी रुपयांच्या बनावट नोटा असून, सदर नोटा सिकंदर राम (रा. मुंबई) याचे मार्फत मिळू शकतात. परंतु, सिकंदर राम हा त्यासाठी एक लाख रक्कमेची मागणी करीत असून, तो मला कळंबोली (नवी मुंबई) येथे भेटण्यास येणार आहे. याबाबत संबंधित माहिती वरिष्ठांना कळवून त्यानुसार तात्काळ पोलिस पथक तयार केले होते.

सोमवारी (ता. 22) पहाटे तीनच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी  पुलाजवळ एक लाल रांगाची आय टेन मोटार (MH 03 AZ 0502) मधून एक व्यक्ती तेथे आला. यावेळी साध्या वेशातील पोलिसांनी त्याला बनावट नोटाबाबत विचारपूस केली. त्याने ठरल्याप्रमाणे एक लाख रुपये आणले आहेत काय असे विचारले व एक लाख रुपये घेतले व माझे सोबत चला मी बनावट पैशाचा गोडावून दाखवतो, असे सांगून तेथून कळंबोली एक्सप्रेस हायवे रोडने लोणावळा-तळेगाव-दाभाडे व तेथून पुन्हा जुना मुंबई-पुणे हायवे रोडने चाकण, शिक्रापूर रांजणगाव येथे आला असता त्याने मोटारीचा वेग वाढवला. रांजणगाव येथे गाडी न थांबल्याने पथकास त्याच्या  विश्वासार्हतेबाबत शंका आल्याने आरोपीची मोटार ओव्हरटेक करून गाडी थांबून त्याला ताब्यात घेतले.

याबाबत सिकंदर परमेश्वर राम (वय 32, रा. रुम नंबर 183 एफ ओ डब्लू पी आंबेडकरनगर, अब्दुल गफार खान मार्ग वरळी, मुंबई) असे आरोपीने नाव सांगितले असून इतर साथीदार प्रशांत झुटानी, के. पी. सिंग (रा. सुरत, गुजरात) यांनी आपसात संगनमत केले. सिकंदर परमेश्वर राम याने बनावट चलनी नोटाचे गोडावून दाखवतो अशी पोलिस अधिका-यांना खोटी माहिती देऊन त्यासाठी  एक लाख रुपये कळंबोली येथे स्विकारून बनावट नोटांचे गोडावून न दाखवता फसवणूक केली. या प्रकरणी सिकंदर परमेश्वर राम, कमलेश जैन, प्रशांत झुटानी, के. पी. सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी सिकंदर परमेश्वर राम याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर येथे हजर केले होते. पोलिसांनी आरोपींना 15 दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, आरोपींचे वकिल किरण रासकर यांनी युक्तीवाद केल्याने न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, एस आय पवार पोलीस हवालदार मिरगे, शेख, जाधव, कोरवी, शेख, गावडे, चिंचकर, नलावडे, राक्षे, वाघमारे, काळे, मोरे, जगताप या पोलिस पथकाने दोन टीम करून खोटी माहिती देणारे गोपनीय बातमीदार सिकंदर राम यांना अटक केली आहे. याबाबत पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे करीत आहे.