Pune News : सहकारनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या 7 जणांच्या टोळीवर मोक्का, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहकारनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या सराइतांच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का “महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यााअंतर्गत” कारवाई केली आहे. या कारवाईने परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत सुटकेचा श्वास सोडला आहे.

सूरज नारायण अडागळे, आनंद सिद्धेश्वर धडे, एजाज इसाक शेख, मोन्या संजय खंडागळे, मंदार संजय खंडागळे, नागेश दत्ता ढावरे, केदार संजय खंडागळे अशी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर टोळीतील दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सूरज अडागळे हा या टोळी प्रमुख आहे. त्याने पद्मावती, सहकारनगर, तळजाई वसाहत भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशत निर्माण केली आहे. अडागळे व त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी बेकायदा जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न, बाल लैंगिक अत्याचार, शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्यांच्या टोळीची परिसरात दहशत होती. त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरूच होते. यामुळे सहकारनगर पोलिसांनी त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. तो परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे पाठवला. त्यानंतर या कारवाई करून हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.