Pune News : पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी होणार्‍या पुण्यातील ‘एल्गार परिषदे’स परवानगी नाकारली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान लोकशासन आंदोलन संस्थेच्या वतीने प्रस्तावीत कार्यक्रमासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे अशी माहिती आता समोर आली आहे.

उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान प्रस्तावित कार्यक्रम घेण्यासाठी रीतसर परवानगी मागितली होती. मात्र, त्यावर पोलिसांनी राज्यात तसेच पुणे शहरात अद्यापही कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. ब्रिटन येथे आढळून आलेल्या नव्या स्वरूपाच्या विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी सरकारच्या स्तरावर विविध उपाय योजना करण्याचे काम सुरू असल्याचे सांगुन प्रस्तावित कार्यक्रमास परवानगी नाकारली आहे.

दरम्यानच, पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद होणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर एल्गार परिषदेचा सर्वांगीण अभ्यास करूनच परवानगी द्यावी अशी मागणी ब्राम्हण महासंघाच्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात एल्गार परिषदेवरून वाद पेटण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, आता पोलिसांकडूनच गणेश कला क्रीडा मंच येथे होणार्‍या प्रस्तावित कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे.