Pune News : बाणेर येथील जमिनीचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न पडला ‘महागात’ ! पोलीस हवालदार सुनिल पवार तडकाफडकी ‘निलंबित’

पुणे (pune) : गुंडांशी संगनमत करुन बाणेर येथील जागेत अतिक्रमण करुन त्याचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न एका ‘वलयांकित’ पोलीस हवालदाराला चांगलाच महागात पडला आहे. पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी पोलीस हवालदार सुनिल सुदाम पवार यांना निलंबित केले आहे.  हवालदार सुनिल पवार हे सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूकीला असतानाही बाणेर येथील जागेबाबत ते पैशांची देवाण घेवाणीबाबत चर्चा करत होते.

बाणेर येथील स.नं. ३३/२ पैकी १ येथील २३.१० गुंठे जागेवर काही गुंडांनी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण करुन बेकायदेशीरपणे ११ जानेवारी २०२१ रोजी ताब्यात घेतली होती. त्याबाबत अमोल पांडुरंग कळमकर (रा. माधवबाग सोसायटी, बाणेर) यांनी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केली.

तसेच ऋषिकेश बारटक्के यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यांची चौकशी केली असताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखविले. त्यात हवालदार सुनिल पवार हे त्या जागेचा ताबा मिळवण्याकरीता पैशांची देवाण घेवाणीची चर्चा करत असल्याचे दिसत आहे. तसा ऋषिकेश बारटक्के यांचा सविस्तर जबाब घेण्यात आला आहे. याबाबत झालेली चौकशीवरुन व सादर केलेल्या ऑडिओ व व्हिडिओ रेकॉडिंगवरुन हवालदार सुनिल पवार यांनी शिस्तप्रिय पोलीस खात्यात कर्तव्यास असून त्यांचे वर्तन हे पोलिसांबद्दल जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी असून त्यांचे वर्तन बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असून पोलीस दलास अशोभनीय आहे. त्यामुळे सुनिल पवार याला निलंबित करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी काढला आहे.