Pune News : कोंढव्यातील सराईत गुन्हेगाराला MPDA खाली स्थानबद्ध करुन येरवड्यात रवानगी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढवा पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर एमपीडीएखाली स्थानबद्ध करुन त्याची १ वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

ओंकार चंद्रशेखर कापरे (वय २५, रा. कोंढवा खुर्द ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कापरे याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे ६ गुन्हे दाखल असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करुनदेखील त्याने आपल्या साथीदारांसह पुन्हा गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा परिसरात दहशत असून तो लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे असे प्रकार करीत असे. कोंढवा पोलीस ठाण्यातील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, अंमलदार चंद्रकांत माने, जगदीश पाटील, ननावरे, पाटील यांनी ओंकार कापरे याच्याविरुद्धचा पुरावा गोळा केला.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.

पोलीस आयुक्तांनी त्याची पडताळणी करुन ओंकार कापरे याला १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार कापरे याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.