‘लक्ष्मण’रेषा ओलंडणाऱ्यावर होणार कडक कारवाई; पुणे शहरातील सुरक्षेची आमच्यावर जबाबदारी – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – गुंडांनी त्यांना आखुन दिलेल्या लक्ष्मण रेषेच्या आतच रहावे सार्वजनिक ठिकाणी त्यांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, शहरातील कायदा व्यवस्थेवर परिणाम झाला तर अशा लक्ष्मण रेषा ओलांडणाऱ्यावर पोलीस कठोर कारवाई करतील. आज झालेली कारवाई ही केवळ सुरुवात आहे. पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे.येणाऱ्या दिवसात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यावर काय कारवाई होईल, हे येत्या काही दिवसात दिसून येईल, अशा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला.

कुख्यात गुंड गजानन मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शेकडो मोटारींसह तळोजा ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणुक काढली होती. तसेच कोथरुडमधील पौड रोडवरील शास्त्रीनगर येथे शेकडो समर्थकांसह त्याने गणपती मंदिरात आरती केली होती. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार खूप वाईट झाला. अनेक तरुणांनी त्याचे स्टेटस ठेवल्याचे समजले. व्यक्तीश आपल्याला या सर्व प्रकाराबाबत वाईट वाटले. आज शहरातील सर्व पोलीस अधिकार्यांच्या बैठकीत (क्राईम मिटिंग) याच विषयावर अधिक चर्चा झाली. गुंडांकडून शहरात अशा प्रकारे दहशतीचे वातावरण पोलीस कधीच खपवून घेणार नाही.

दरम्यान गुन्हेगारी टोळ्यांमधील काही मोरके तुरुंगातून सुटले असले तरी त्यांनी शहराच्या सुरक्षेमध्ये बाधा आणली तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुंडांवर मोक्का तसेच अन्य कडक कलमांद्वारे कारवाई करुन त्यांची गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुणेकर आणि पुणे शहराच्या सुरक्षित वातावरणावर कोणी बाधा आणणार असेल तर त्यांची गय करणार नाही. काल आम्ही केलेली कारवाई ही केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसात अशी दहशत पसरविणाऱ्यावर काय कारवाई होते, हे सर्वांना दिसून येईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिसनामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.