Pune News : थकलेल्या मिळकतकरापोटी सील केलेल्या ‘त्या’ 12 मिळकतींचा ‘लिलाव’ करण्याची प्रकिया सुरू, पुणे महापालिकेच्या इतिहासात कर आकारणी व कर संकलन विभागाचे धाडसी पाउल

पुणे (Pune) – उत्पन्न वाढीसाठी महत्वपुर्ण पावले उचलणार्‍या महापालिका प्रशासनाने मिळकतकर वसुलीबाबतही कडक पावले उचलली आहेत. थकबाकी भरून घेण्यासाठी अभय योजना राबविताना ऐतिहासिक वसुली करतानाच वर्षानुवर्षे थकबाकी ठेवणार्‍या मिळकतीही सील केल्या आहेत. यापुढे जाऊन महापालिकेच्या इतिहासात बहुधा प्रथमच सील केलेल्या मिळकतींचा ‘लिलाव’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून थकबाकीदारांना हा एकप्रकारे इशाराच असल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाने वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या ९० हून अधिक मिळकती सील केल्या आहेत. मागील तीन महिन्यांच्या कालावधीत व यापुर्वीही सील केलेल्या काही मिळकतींचा यामध्ये समावेश आहे. यापैकी १२ मिळकतींचा लिलाव करून मिळकतकर वसुल करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. या मिळकतधारकांकडे ७० लाख रुपयांहून अधिकची थकबाकी आहे. या मिळकतींचे महापालिकेच्याच नगर रचना विभागाकडून मुल्यांकन करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मुल्यांकनाचे काम पुर्ण होईल. यानंतर संबधित मिळकतधारकांना अंतिम नोटीसेस पाठविण्यात येतील. त्यांना १५ दिवसांचा अवधी देण्यात येईल. या कालावधीत थकबाकीदारांनी मिळकतकर न भरल्यास फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत या मिळकतींचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली. मिळकतकर थकबाकीसाठी कर आकारणी व कर संकलन विभागाच्यावतीने प्रथमच ही कारवाई करण्यात येत असल्याचेही कानडे यांनी नमूद केले.

पुणे शहरामध्ये ११ लाखांहून अधिक मिळकतींची कर आकारणी झाली आहे. परंतू मागील काही वर्षात सुमारे तीन लाखांहून अधिक मिळकतधारकांकडे थकबाकी आहे. मोबाईल टॉवर्सच्या मिळकतकरासह सुमारे ५ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. परंतू यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये दुबार आकारणी, तीन पट दंड तसेच अन्य तांत्रिक बाबींमुळे अनेकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. थकबाकी वसुलीसाठी हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीच्या मान्यतेने ५० लाख रुपयांच्या आतमध्ये थकबाकी असलेल्या मिळकतींसाठी अभय योजना राबविण्यात येत आहे. एक नोव्हेंबरपासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून पालिकेला आतापर्यंत ४०० कोटी रुपयांहून अधिक थकबाकी वसुल करण्यात यश आले असून २६ जानेवारीपर्यंत ही योजना राबविण्यात येणार आहे. यासोबतच पालिकेने आकारणी न झालेल्या मिळकतींचा शोध सुरू केला असून वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मिळकतीही सील करण्यात येत आहेत. या मोहीमेअंतर्गत सील करण्याची कार्यवाही झाल्यानंतर काही मिळकतकर धारकांनी थकबाकीही भरली आहे. परंतू विहीत मुदतीत थकबाकी न भरणार्‍या १२ मिळकतींचा लिलाव करण्यात येणार असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणनार यात शंका नाही.