Pune News : घरोघरी कचरा उचलणारी कचरा वेचकांची ‘स्वच्छ संस्था’ मोडीत काढण्याचा घाट, मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाचा निषेध – सुमन मोरे
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वच्छ पुणे शहरासाठी महापालिकेच्याच पुढाकारातून २० वर्षापुर्वी सुरू झालेल्या कचरा वेचकांच्या ‘स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थेचे काम काढून ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. लवकरच या संस्थेच्या माध्यमातून शहरातील लाखो घरातून कचरा गोळा करणार्या साडेतीन हजार कचरावेचकांची सभा बोलावून पुढील वाटचाल ठरवली जाईल, असा इशारा स्वच्छ संस्थेच्या अध्यक्षा सुमन मोरे यांनी दिला आहे.
नुकतेच स्थायी समितीने स्वच्छ संस्थेसोबत पंचवार्षिक करार वाढवून देण्याऐवजी केवळ तीन महिने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच स्वच्छ संस्थेऐवजी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारांना यामध्ये सामावून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुळातच स्वच्छ पुणेच्या माध्यमातून २०१३ साली कचरा वेचकांची स्वच्छ ही सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मागील ७ वर्षात या संस्थेने शहरातील निम्म्याहून अधिक घरातून कचरा गोळा करण्याचे जाळे निर्माण केले आहे. विशेष असे की कचरा नेण्यासाठी नागरिकांकडून कचरा वेचकांना प्रतिमहिना ७० रुपये दिले जातात. तर झोपडपट्टयांमधून कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेकडून प्रतिघरामध्ये १० रुपये अनुदान दिले जाते. तर सुमारे साडेतीन हजार कचरा वेचकांच्या कामांचे नियोजन करणार्या सुपरवायजर मंडळींचे साधारण ५ कोटी रुपये वार्षिक वेतन महापालिकेकडून दिले जाते. तसेच घंटागाड्या, हँडग्लोज व अन्य सुरक्षा साधने महापालिकेकडून पुरविण्यात येतात. तसा करारही महापालिका आणि स्वच्छ संस्थे दरम्यान झालेला आहे.
असे असताना काही नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेचे काम काढून निविदा पद्धतीने ठेकेदार नेमण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष असे की, नवीन ठेकेदारांकडे तुम्हालाच काम मिळेल, असे कचरा वेचकांना सांगण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे सहकारी संस्थेच्या माध्यमातून अगदी किफायतशीर दरात सेवा देणार्या कचरा वेचकांना नोकर करण्याचा प्रकार सुरू आहे. यामागे ठेकेदारांचे हितसंबधच असल्याचे उघड होत आहे. आत्मनिर्भरतेवर भर देउन रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरू असताना कचरा वेचकांची कार्यक्षम सहकारी संस्था मोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे. याचा आम्ही निषेध करतो. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाविरोधात कचरा वेचकांची सभा घेउन पुढील वाटचाल ठरविली जाईल, असा इशारा स्वच्छ संस्थेच्या अध्यक्ष कचरा वेचक सुमन मोरे यांनी दिला आहे.