Pune News : कोंढव्यातील डी. पी. रस्त्यासाठी तातडीने निधी द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महापालिका प्रशासनाला आदेश

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढव्यातील प्रस्तावित १८ मीटर डीपी रस्त्यासाठी महापालिकेने तातडीने निधी मंजूर करुन हे काम सुरु करावे. तसेच यामध्ये अतिक्रमण केलेल्यांवर शासकीस कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका अधिकार्‍यांना दिले आहेत.

कोंढव्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्किट हाऊसवर बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी हे आदेश दिले.

या बैठकीला महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकारी, आमदार चेतन तुपे , नगरसेवक हाजी गफूर पठाण, माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके,ऑल कोंढवा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी फिरोज, नगरसेविका परवीन हाजी फिरोज, नगरसेविका हमीदा सुंडके,नगरसेविका नंदा लोणकर , माजी नगरसेवक रईस सुंडके, नारायण लोणकर , जविद पठाण, जाबिर शेख,आदि उपस्थित होते.

कोंढव्यातील अनेक प्रश्न निधी अभावी रेंगाळले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावरुन पवार यांनी बैठक घेतली. कुमार पृथ्वी ते ज्योती हॉटेल दरम्यानचा १८ मीटरच्या डी पी रस्त्याचे काम गेल्या ३ ते ४ वर्षांपासून रेंगाळले आहे. या रस्त्यासाठी तातडीने निधी द्यावा, अशी सूचना पवार यांनी केली.

यादरम्यान नगरसेवक यांनी या जागेवर अनधिकृत झोपड्या, बांधकामांचे अतिक्रमण झाले असल्याचे सांगितले. तेव्हा अजित पवार यांनी ही अनधिकृत बांधकामे तातडीने हटवावीत. जर कोणी अडथळा आणला तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

कोंढव्यातील सिव्हिल हॉलचा प्रकल्पावर आतापर्यंत सहनिधीतून केवळ २५ लाखांचे काम झाले आहे. हा प्रकल्प ७ ते ८ कोटी रुपयांचा आहे. महापालिका निधी देत नसल्याची नगरसेवकांची तक्रार होती. त्यावर पवार यांनी आपण स्वत:च्या उपमुख्यमंत्री निधीतून या प्रकल्पासाठी पुणे जिल्हा नियोजन कमिटी( DPDC ) मार्फत ४ कोटी रुपये देऊ. महापालिकेने बजेटमध्ये तरतुद करावी, असे सांगितले.

कोंढव्यातील ९ एकरावर होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा प्रश्न निधी अभावी अडकला असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. या ठिकाणी क्रिकेट, फुटबॉलसाठी मैदान तसेच टेबल टेनिस, हॉलीबॉल, जीम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३० ते ३५ कोटी रुपये खर्च असल्याचे सांगण्यात आले त्यासाठी निधी मिळवून देऊ, असे अजित पवार यांनी नगरसेवकांना आश्वासन दिले.

नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी अजितदादा यांचेकडे मागणी केली की कोंढव्याचे विकासासाठी प्रशासन दुर्लक्ष करत आहेत आपण लक्ष दिले तर सर्व कामे मार्गी लागतील असे पठाण यांनी सांगितले .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर आता कोंढव्यातील रेंगाळलेले हे प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.