Pune News : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात खासगी खटला दाखल, केली ‘ही’ मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आज पुणे लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने खासगी खटला दाखल केला आहे. लष्कर न्यायालयात हा खटला दाखल केला गेला आहे.

ऍड. भक्ती राजेंद्र पांढरे (वय 24) यांनी याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत परळीच्या 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यभर खळबळ उडाली. पण याप्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, असा आरोप करत भाजपचे रान उठवले आहे. तर पुणे पोलिसांकडून तपास काढून तो एखाद्या सक्षम अश्या आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावी, अशी मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी काल गुरुवारी केली. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली.

दरम्यान गेल्या आठवड्यात लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वानवडी पोलिसांकडे केली होती. निवेदन देत त्यांनी ही मागणी केली होती. गुन्हा दाखल न केल्यास त्यात खासगी खटला दाखल करू, असे देखील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्या वतीने सांगण्यात आले होते. आज लीगल सोसायटीच्या वतीने लष्कर न्यायालयात खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते संभाषण आणि इतर माहिती देऊन हा खटला सुरू करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे असे म्हंटले आहे.