Pune News : पुणे शहर पोलिसांकडून गँगस्टर निलेश घायवळला मोक्काच्या गुन्हयात अटक, संपुर्ण टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुविख्यात गँगस्टर निलेश घायवळवर व त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई करत अटक केली आहे. त्याला येरवडा कारागृहातून पोलिसांनी अटक केली आहे. नुकतीच त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करत एक वर्षांसाठी येरवडा कारागृहात रवानगी केली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या एमपीडीए व मोक्काच्या कारवाईने गुन्हेगार अन् गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

निलेश बन्सीलाल घायवळ (वय 44), संतोष आनंद धुमाळ (वय 38) व मुसाब उर्फ मुसा इलाही शेख (वय 29) अशी मोक्कात अटक केलेल्याचे नावे आहेत. तर कुणाल, कंधारे, अक्षय गोगावले, विपुल माझीरे व इतर 3 जणांवर मोक्काच्या कारवाई केली आहे. त्यात ते फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

 

 

 

 

 

फिर्यादी यांचा गाड्या दुरुस्ती व विक्री खरेदीचा व्यवसाय आहे. त्यांचे डावी भुसारी कॉलनी येथे गॅरेज आहे. दरम्यान, त्यांनी गॅरेजला एक महिंद्रा पिकअप कार पार्क केली होती. यावेळी गेल्या वर्षी गुन्हेगार संतोष धुमाळच्या सांगण्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना चोपरचा धाक दाखवून तसेच शिवीगाळ करत महिंद्रा गाडी जबरदस्तीने नेली. त्यांनी ही गाडी भाऊच्या रॅलीसाठी म्हणून ही गाडी नेण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी याने याबाबत खंडणी विरोधी पथकात  तक्रार केली होती. त्याची चौकशी केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करत घायवळ टोळीचा प्रमुख हस्तक संतोष धुमाळ आणि मुसा याला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरू होता. यावेळी या गुन्ह्यात गँगस्टर निलेश घायवळचा सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्काची कारवाई करत निलेश घायवळ याला अटक केली आहे. त्याला आज येरवडा कारागृहातून खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. त्याची रवानगी आता मोक्कानुसार 3 वर्षांसाठी कारागृहात होणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळुंखे, प्रदीप शितोळे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ व प्रदीप गाडे, रुपाली कर्णावर, आशा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.