Pune News : ‘पती माझा फोटो WhatsApp ‘डीपी’ला ठेवत नाही’; पत्नीच्या तक्रारीने पोलिससुद्धा हैराण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पती – पत्नी म्हणले कि भांड्याला भांड लागनार, छोट्या – मोठ्या कारणावरून एकमेकांचे खटके उडणार हे साहजिकच आहे. आज काल ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे. पण याच व्हॉट्सअ‍ॅपमुळे एखाद्याचा संसारात वादाची ठिणगी पडल्याचे तुम्ही क्वचितच ऐकले असेल. या प्रकारची घटना पुणे मध्ये घडली आहे. या भांडणाचे नेमकं कारण म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी! माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पती त्यांचा फोटो डीपीला ठेवतात.पण माझा पती ठेवत नाही अशी तक्रार एका महिलेने पोलिसांकडे दिली आहे. या गोष्टीवरून दोघांमध्ये सतत वाद होत असे. याबाबतीत महिलेने केलेल्या तक्रारीमुळे हे प्रकरण भरोसा सेलकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणावर आता तोडगा निघाल्याने दोघे पती- पत्नी आता आनंदाने राहू लागले आहेत.

दोघांमध्ये नेमके काय घडले ?
“आमच्या विभागात कौटुंबिक समस्याबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्याचं काम केले जातं. असंच एक दिवस दुपारच्या सुमारास एक महिला आमच्या विभागात आली. तिने अर्ज केला की, ‘पती माझ्याकडे लक्ष देत नाही. मला वडील नाहीत. त्यामुळे आई व लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे. परंतु माझी आई आणि बहीण माझ्या माहेरीच राहतात. आम्हा पती पत्नीमध्ये काही वाद नाहीत. पती आणि मी जमेल तसे एकमेकांना विचारून आईला मदत करतो. त्या दोघीही आम्हाला अडीअडचणीच्या वेळी मदत करतात. आमच्या दोघांमध्ये संवाद चांगला आहे. पती कडून कोणताही त्रास नाही. नवरा कोणताही त्रास देत नाही.’ त्या महिलेकडून सर्व हकिकत ऐकून घेतली. त्यावर तुम्हाला नेमका त्रास काय आहे आणि इथे का अर्ज केला. त्यावर ती म्हणाली, ‘माझा पती व्हॉट्सअ‍ॅपला माझा डीपी ठेवत नाही. म्हणून मी त्याच्यावर नाराज आहे.’ यावर त्या महिलेच्या पतीकडे याबाबत विचारणा केली. तो म्हणाला, ‘मी हिची सगळी काळजी घेतो. तिला जपतो. माझ्या मेहुणीच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. सासूबाईंना आधार देतो. वयोमानानुसार काही दुखणी असेल, तर दवाखान्यात घेऊन जातो. तरी ही माझ्याशी तिचा डीपी मी माझ्या व्हॉट्सअ‍ॅपला का ठेवला नाही म्हणून सारखी चिडत असते. त्यावरून आमच्यात सतत भांडण होत राहतात. मी काय करावं हेच मला कळत नाही,” असे त्या महिलेच्या पतीकडून सांगण्यात आले आहे अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांच्याकडून देण्यात आली आहे.

समुपदेशानाने दोघे आले एकत्र…
भरोसा सेलकडून त्या महिलेचं समुपदेशन करण्यात आले. “तुझा पती तुझी काळजी घेतो. काय हवं नको ते पाहतो. तुझ्या घरच्यांची काळजी घेतो. याचा अर्थ त्याच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग तुझा एक फोटो डीपी म्हणून ठेवण्याने काही विशेष फरक पडणार आहे, की तुमचं काही नुकसान होणार आहे का?” यावर त्या महिलेने नाही असे उत्तर दिले. प्रेम हे दाखविण्यासाठी नसतं तर ते आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करायचे असते. तरच ते खरं प्रेम असतं याची जाणीव तिला करून देण्यात आली. त्यानंतर ते दोघे आमच्या भरोसा विभागातून यापुढे एकमेकांच्या बद्दल कधीच अशा प्रकाराची भावना येणार नसल्याचे सांगत निघून गेले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच “आमच्याकडे अनेक प्रकरण येत असतात. पण आम्ही वेळोवेळी समुपदेशन करून एकत्र आणतो. मात्र समाजातील प्रत्येकानं एकमेकांसोबत कोणत्याही प्रकाराचे वाद झाल्यास किंवा काही घटना घडल्यास संवाद राखला पाहिजे. त्यातून निश्चित मार्ग निघतो,” असा सल्लासुद्धा सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांच्याकडून दाम्पत्यांना देण्यात आला.