Pune News : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या घटनेची अन् तपासाची माहिती पुणे पोलिसांकडून महिला आयोग अन् पोलिस महासंचालकांकडे सुपूर्द; मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परळीच्या 22 वर्षीय पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं लक्ष घालत पुणे पोलिसांना त्याचा अहवाल सादर करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आणि घटनेचा पूर्ण अहवाल महिला आयोगाला दिला आहे. त्याच अहवालाची एक प्रत पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना देखील देण्यात आली आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.  शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव या आत्महत्या प्रकरणात घेतले जात असल्यानं खळबळ उडालेली आहे.

गेल्या आठवड्यात मूळची परळी येथील पूजा चव्हाण हिने वानवडी परिसरात उडी मारत आत्महत्या केली. यानंतर आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. राजकीय घडामोडी होत असतानाच यात राष्ट्रीय महिला आयोगाने लक्ष घातले होते.

राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करत या प्रकरणी दखल घेण्याची विनंती केली होती. यानुसार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी यात लक्ष घालत पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. रेखा शर्मा यांनी या प्रकरणी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरीक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. पोलिसांनी लवकरात लवकर तपास अहवाल आयोगाला सादर करावा असं यात लिहिलं आहे. इतकंच नाही तर या प्रकरणी काय कारवाई केली हेही यात असावं असंही त्यांनी नमूद केलं आहे.

त्यानुसार पुणे पोलिसांनी घटनेचा आणि त्यात आजपर्यंत झालेल्या तपासबाबतचा अहवाल पोलिसांनी महिला आयोगाला आज मंगळवारी पाठवला आहे. तसेच हा अहवाल पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांना देखील दिला आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी सादर केलेल्या घटनेच्या तपासामुळं वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार की आणखी काय होणार याबाबत लवकरच स्पष्टता येईल हे लवकरच कळणार आहे.