Pune News : पुणे पोलिसांकडून गजानन मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर छापा, अटकेसाठी युध्दपातळीवर प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृह ते पुणे अशी शेकडो गाड्या आणि तरुणाईसोबत ‘रॉयल एन्ट्री’ मारणारा कूविख्यात गजा मारणे फरार झाल्यावर आता त्याच्या मुळशीमधील फार्म हाऊस आणि घराची झडती घेण्यात आली आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी झडती घेतली आहे. तर त्याचे कुटुंबीय आणि इतरांकडे विचारपूस देखील केली गेली आहे.

‘रॉयल एन्ट्री’मुळे कूविख्यात गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारावर पहिला गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल करत पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला. याच प्रकरणात त्याच्यावर 4 गुन्हे दाखल झाले. तर पुणे पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याने व त्याच्या साथीदारांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल केला. यानंतर गजानन मारणे व त्याची ‘पलटण’ फरार झाली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वेगवेगळी पथके त्यांच्या मागावर आहेत.

या दरम्यान, पोलीस त्याचा संभाव्य अशा सर्व ठिकाणी शोध घेत आहेत. तर संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली जात आहे. त्यानुसार आज वारजे माळवाडी पोलिसांनी अचानक सकाळी-सकाळी गजानन मारणे याच्या मुळशी येथील फार्म हाऊस येथे छापा टाकत सर्च घेतला. तर दिवसभरात त्याचे कुटुंबीय तसेच इतरांकडे चौकशी करत विचारपूस केली आहे. गजा मारणे याला व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.