Pune News : पुण्यातील मगरपट्टा सिटी परिसरात पार पडलेल्या ‘त्या’ शाही विवाह सोहळ्याची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील मगरपट्टा सिटी परिसरात पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्याची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, कोरोनाच्या अनुषंगाने नियम न पाळल्याने ही चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा येथील लक्ष्मी लॉन्स याठिकाणी रविवारी सायंकाळी विवाह संपन्न झाला. हा शाही विवाह सोहळा दिमाखात पार पडला, खरा पण आता महाडिक यांना हा विवाह सोहळा अडचणींचा ठरणार आहे. परंतु या विवाह सोहळ्याला सर्व राजकीय पक्षातील दिग्गज नेते हजर होते. मोठया प्रमाणात विवाह सोहळ्याला गर्दी देखील झाली होती. एकीकडे कोरोनाचा प्रसार वाढत असून, तो रोखण्यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करत आहे. त्यात लग्न सोहळ्याला 200 व्यक्तींना परवानगी दिली आहे. तर पोलीस परवानगी देखील अनिवार्य केली आहे. पण या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

त्यामुळे पुणे पोलिसांनी या विवाह सोहळ्याची चौकशी सुरू केली आहे. परवानगी घेतली होती का, किंवा त्यात नियम मोडले का, हे पाहिले जाणार आहे. परंतु, कोरोना अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांचं याठिकाणी उल्लंघन झाल्याच पाहिला मिळाले आहे. त्यामुळे चौकशी करण्यात येत असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.