Pune News : शर्जील उस्मानीच्या एल्गार परिषदेतील भाषणाची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू, मोठ्या कारवाईची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेली (दि 30 जानेवारी) एल्गार परिषदेवरून वाद सुरू झाला असून, परिषदेत झालेल्या शर्जील उस्मानी याच्या एका वाक्याचे चांगलेच पडसाद उमटले असून, आता यानंतर पुणे पोलिसांनी या भाषणाची चौकशी सुरू केली आहे. त्यात गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

शहरात 30 जानेवारी रोजी एल्गार परिषद पार पडली. यात अनेक वक्ते सहभागी झाले होते. त्यात प्रत्येकाने भाषण केले. यावेळी वक्ता म्हणून आलेला शर्जील उस्मानी यांने भाषणात ‘आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, 14 वर्षाच्या जुनेदला धावत्या ट्रेनमध्ये 31 वेळेस चाकूचे वार करून मारले जात असताना त्यांना कोणी थांबवत नाही. अशाप्रकारे ‘लिंचींग’ करून हत्या करणारी ही लोक घरी जातात, दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्यात येऊन मिसळतात आणि आणखी दुसऱ्या कोणाच्या हत्या करतात” अशा प्रकारचे वक्तव्य केलं आहे. या वक्त्यावर आता वाद सुरू झाला आहे. भाजपने जोरदार विरोध करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेत झालेल्या या भाषणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.