Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

पुणे (Pune ) – महापालिका हद्दीचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहराला खडकवासला धरणातून हक्काचे १६ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणे शहराला हे हक्काचे पाणी मिळावे याकरिता काँग्रेस पक्ष गेली काही वर्षे सातत्याने मागणी करत असून त्याकरीता पक्षाने संघर्षही केला आहे. २०१८ साली तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर भजन आंदोलनही केले होते. त्यात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. नागरिकांचाही पाठिंबा मिळाला होता. शहरात ठिकठिकाणी अशी आंदोलने करण्यात आली होती. या तीव्र आणि चिकाटीने चालविलेल्या आंदोलनाची दखल भाजपला घ्यावी लागली होती. तेव्हा १३५०एमएलडीहून अधिक पाणी पुणे शहराला देवू असे आश्वासन तत्कालीन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. प्रत्यक्षात तितके पाणी मिळाले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही काँग्रेस पक्षाने ही मागणी उचलून धरली होती. तीच मागणी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा करीत असून, पाण्याच्या प्रश्नाबाबत काँग्रेस पक्ष पुणेकरांबरोबरच राहील असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश नुकताच झालेला असून अजून ३४ गावांचा समावेश होऊ घातला आहे. हा विस्तार पाहता १६ टीएमसी पाणी गरजेचेच आहे. भामा-आसखेड धरणातून १.५ टीएमसी पाणी पुण्याला मिळणार आहे. त्यातून शहराच्या एका भागाची गरज भागेल. पण, संपूर्ण शहराचा विचार करता पुण्याला जादा पाणी आणि त्या पाण्याचे काटेकोर नियोजन याची गरज आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्रात सत्ता असताना पुणेकरांना हक्काचे पाणी देण्याची संधी भाजपला होती पण, त्या मागणीकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही आणि निर्णयही घेतले नाहीत. सत्ता असताना पुणेकरांच्या तोंडाला पाने पुसली. आता मात्र विरोधी बाकांवर बसल्यावर पुणेकरांना न्याय्य हक्काचे पाणी मिळावे याची आठवण भाजपचे खासदार गिरीश बापट आणि आमदारांना झाली. हा दुटप्पीपणा असल्याची टीका मोहन जोशी यांनी केली आहे. मात्र, काँग्रेस पक्ष आपल्या मागणीवर पहिल्यापासूनच ठाम असून त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.