Pune News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍याला सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   क्लासवरून घरी जात असलेल्या १५ वर्षीय मुलीला अडवून तिच्या अंगाला हात लावून विनयभंग करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पोस्को न्यायालयाचे विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

अमोल अशोक निकम ( वय २५, रा. जाधवनगर, येरवडा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यामध्ये संबंधित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. जुलै २०१७ मध्ये येरवडामधील जाधवनगरमध्ये हा प्रकार घडला होता. संबंधित मुलगी क्लासवरुन घरी जात असताना निकम याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तिच्याजवळ येऊन तुझे नाव काय आहे, असे विचारले. तू मला आवडतेस असे म्हणून तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याने मुलीचा पाठलाग करीत तिचा हात धरला. ‘तुला हा गॉगल सूट होत नाही. तो काढून टाक’ असे म्हणून तिचा विनयभंग केला. हा प्रकार मुलीने आई-वडीलांना सांगितल्यानंतर ते आरोपीला समजावण्यासाठी गेले. तेव्हा निकम याने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मनिषा टुले यांनी केला. त्यांना मुख्य पोलिस हवालदार नितीन भुजबळ आणि पैरवी अधिकारी विठ्ठल माने यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी पाहिले. त्यांनी सुनावणी दरम्यान तीन साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी मुलीची साक्ष महत्वाची ठरली.