Pune News : जामिनासाठी बनवणारे रॅकेट राज्यभर ‘अ‍ॅक्टीव्ह’, राज्यातील इतर न्यायालयातील प्रकरणांची होणार चौकशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून त्याआधारे आरोपींना जामिनावर सोडण्यास मदत करणारे रॅकेट राज्यभर सक्रिय असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासातून पुढे आली आहे. खोटी कागदपत्रे तयार करून एजंटांनी आत्तापर्यंत अनेकदा न्यायालयाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी पोलिस आता राज्यभरात इतर ठिकाणी देखील चौकशी करणार आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या रॅकेटची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. एजंटांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक स्थापन करून 37 जणांना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी आत्तापर्यंत 19 जणांना अटक केली आहे. तर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्हा कोणता आहे व त्यातील आरोपींची आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेत देखील एजंट पैसे घेत.

बनावट कागदपत्रे व जामीनदार दिल्याने आरोपीचा शोध घेणे मुश्‍कील होते. त्यामुळे फरार होणारे आरोपींना हे एजंटाचे कागदपत्रे पुरवत.

एजंटांनी आत्तापर्यंत कोणाकोणाला जामिनासाठी बनावट कागदपत्रे पुरवली आहेत?, बनावट कागदपत्रांचा जामीनाव्यतिरिक्त कोणत्या कामासाठी वापर करण्यात आला आहे? एजंटांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? या बाबींचा अद्याप तपास बाकी आहे. तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे.

ठराविक गुन्ह्यातच पुरवली जात कागदपत्रे –

चोरी, घरफोडी, दरोडा, पोक्‍सो यासारख्या गुन्ह्यातील आरोपींनाच जामीन मिळण्यासाठी बोगस आधारकार्ड, रेशन कार्डची झेरॉक्‍स, सात-बारा उतारा दिला जात. त्याआधारे जामीन मिळवून देणारे एजंट आणि वकील आपसांत संगनमत करून खोटे कागदपत्रे खरे असल्याने भासवून न्यायालयाची फसवणूक करीत. अशा प्रकारे जामीन मिळालेले बरेचसे आरोपी फरार होत.