Pune News : लग्न व बलात्काराचे प्रकरण : पीडित मुलगी व तिची आई ‘फितूर’ झाल्यावरही न्यायालयाने आरोपीला दिली सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अल्पवयीन मुलीशी बेकायदेशीरपणे लग्न करून तिच्यावर बलात्कार प्रकरणात पीडित मुलगी आणि फिर्याद देणारी तिची आई फितूर झाल्यावरही न्यायालयाने आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी हा निकाल दिला. खटल्यादरम्यान डीएनए चाचणीचा पुरावा महत्त्वाचा ठरला.

अशोक रमेश कदम (वय 29, रा. येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 15 मे 2015 आणि त्यापूर्वीच्या सहा महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडला. पीडितेचे कुटुंबीय आजीकडे राहायला गेले होते. त्यावेळी 14 वर्षीय पीडित मुलगी आणि अशोक यांची ओळख झाली होती. फिर्याद देण्याच्या सहा महिन्यापूर्वी पीडित घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती तीन दिवसांनी घरी आली. घरच्यांनी तिच्याकडे याबाबत विचारणा केली असता तिने मैत्रिणीकडे गेल्याचे सांगितले. त्यानंतर दोन महिन्यांनी तिला अशक्तपणा आल्याने डॉक्‍टरकडे नेण्यात आले. त्यावेळी ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. विश्‍वासात घेतल्यावर तिने अशोक याने आपल्यावर एका खोलीत वेळोवेळी बलात्कार केला. त्यानंतर आळंदी येथे नेऊन लग्न केल्याचे सांगितले. मात्र पीडिता अल्पवयीन असल्याने लग्न ग्राह्य धरण्यात आले नाही. त्यामुळे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 376 आणि बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी 8 साक्षीदार तपासले. सहायक पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार एस. व्ही. चिकणे यांनी मदत केली.