Pune News : कार, फ्लॅट, डिश TV, स्लॅबचं घर असेल तर रद्द होणार रेशनकार्ड, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – केंद्र शासनाने एक लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ज्यांचे घर स्लॅबचे आहे, चार चाकी गाडी, डिश टीव्ही असणाऱ्यांचे वार्षिक उत्त्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे असे गृहीत धरून रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात अशी रेशनकार्ड शोधण्याची मोहीम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
राज्यशासनाने केंद्राच्या आदेशानंतर लगेचच राज्यात अपात्र रेशनकार्ड शोधमोहीम हाती घेतली आहे. यात बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, शुभ्र व आस्थपना कार्ड या सर्व प्रकारच्या कार्डची तपासणी करण्यात येणार आहे.

या संदर्भात बोलताना शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या, शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपात्र रेशनकार्ड धारकांची संख्या असण्याची शक्यता आहे. अशी कार्ड शोधण्यासाठी एक मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक कुटूंबाचा अर्ज व हमी पत्र भरून घेण्यात येणार आहे. सध्या ही मोहिम सुरु करण्यासंदर्भात आवश्यक ती पूर्वतयारी सुरु आहे.

शोध समिती स्थापन
पुण्यात अपात्र रेशनकार्ड शोधमोहीम राबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे . या समितीत अप्पर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अ वर्ग नगरपालिकांचे अधिकारी, जिल्हापुरवठा अधिकारी यांचा समावेश आहे.

सरकारी, खासगी कर्मचाऱ्याचे रेशनकार्ड होणार रद्द
अपात्र रेशनकार्ड शोध मोहिमेत सरकारी, निमसरकारी तसेच खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्त्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे त्यांचे रेशनकार्ड रद्द करावे असे या आदेशात म्हंटले आहे. दरम्यान, या सर्वाना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी असेही म्हंटले आहे. त्याचबरोबर, शहरी भागातील विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहे. हि मोहीम राबवताना आवश्यकता भासल्यास पोलिसांची मदत घेण्यात यावी असेही आदेशात सूचित करण्यात आले आहे. या मोहिमेत अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, दुबार, स्थलांतरित व्यक्ती, मयत व्यक्ती अशांची रेशनकार्ड शोधमोहिमेत रद्द करण्यात येणार आहे.