Pune News : आरोग्यसेवेच्या वाढत्या दरांमुळे सामान्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष – आमदार मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही महिन्यांमध्ये उद्भवलेली कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाची परिस्थिती आणि आरोग्यसेवेचे वाढते दर यामुळे सर्वसामान्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मनात असूनही अनेकांना स्वत:च्या आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे लागत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी होणारी विनामूल्य आरोग्य शिबीरे ही सर्वसामान्यांकरीता उपयुक्त आहेत, असे मत आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

नवचैतन्य क्रीडा संघातर्फे स्व. सुरेश माळवदकर यांच्या स्मरणार्थ सेनादत्त पेठेमध्ये मोफत नेत्र व दंत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, पुणे मनपा सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेवक राजेश येनपुरे, आनंद रिठे, स्मिता वस्ते, भाजपा कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, विनोद वस्ते, भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष योगेश पिंगळे, उपाध्यक्ष ओंकार माळवदकर आदी उपस्थित होते.

ओंकार माळवदकर म्हणाले, सेनादत्त पेठेतील सुमारे ३५० नागरिकांनी नेत्र व दंत तपासणी शिबीरात सहभाग घेत तपासणी केली. ए. एस. जी. व डॉ. केतन आवारे या डॉक्टरांच्या सहकार्याने हे शिबार राबविण्यात आले. आरोग्य तपासणीसोबतच मोफत चष्मे वाटप देखील करण्यात आले. आरोग्य सेवेच्या माध्यमातून यापुढेही असे अनेक उपक्रम संघातर्फे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघाचे सुरेश म्हालिम, विश्वनाथ रासकर, मुकुंद रणपिसे, नितीन देशपांडे, विजय शेळके, विजय घोलप यांसह सर्व कार्यकर्त्यांनी शिबीराच्या नियोजनात सहभाग घेतला.