Pune News : ‘हल्दीराम’ची फ्रॅंचाईजी देण्याच्या बहाणा करत साडे सहा लाख रुपयांना गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध अश्या “हल्दीराम फूड्सची’ फ्रॅंचाईजी देण्याच्या बहाणा करत पुण्यातील एका व्यापाऱ्याला सायबर चोरट्यांनी साडे सहा लाख रुपयांना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी हल्दीराम फूड्सची बनावट वेबसाईट तयार केली होती.

याप्रकरणी उत्कर्ष कन्हैयालाल अग्रवाल (वय 36, रा. अंकुर बंगालो, मुनूरवार सोसायटी, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी “हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रा. ली. या कंपनीची त्याच नावाने बनावट वेबसाईट तयार केली. फिर्यादी यांनी ऑनलाइन पाहणी केली असता त्यांना सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. तसेच त्यांना हल्दीराम फूड्सची फ्रॅंचाईजी देण्याचे आमिष दाखवले. त्यांना वेगवेगळे बोलणे करून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीनी देखील आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आरोपीने सांगितल्यानुसार रजिस्ट्रेशन चार्जेस, सुरक्षा ठेव, ऍग्रिमेन्ट फी व इंटरियर डिझाईन फी, असे 6 लाख 74 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात भरले. पैसे भरल्यानंतर देखील अनेक दिवस वाटपाहूनही त्यांना ही फ्रेंचाइजी मिळाली नाही. यानंतर त्यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली. मात्र, आरोपीने पैसे परत केले नाहीत. त्यानंतर फिर्यादी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.