Pune News : सत्ताधारी भाजप पुणेकरांची लूट करतेय, काँग्रेसने भुमिका स्पष्ट करावी – नगरसेवक अरविंद शिंदे यांचा काँग्रेसला घरचा आहेर

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणूक लढण्यासाठी भाजप महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून चुकीच्या विषयांना मंजुरी देत आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस पक्ष नगरसेवकांची साधी बैठकही बोलावत नाही. पुणेकरांच्या पैशाची लूट होत असताना ‘ काँग्रेस ‘ ने या विषयांवर आपली भुमिका स्पष्ट करावी अशी शहर अध्यक्षांकडे मागणी करत काँग्रेस चे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी एकप्रकारे पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या भूमिकेबाबत ‘ प्रश्नचिन्ह ‘ निर्माण केले आहे.

नगरसेवक शिंदे यांनी यासंदर्भात काँग्रेस चे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये कॅश क्रेडिट बॉंड च्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावरील 12 रस्ते आणि 2 उड्डाणपूलाँसाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव हा फक्त ठराविक बांधकाम व्यावसायिकांसाठी आहे. यामधून जनतेच्या पैशाची लूट केवळ या व्यावसायिकासाठी केली जाणार आहे.

शहरातील ठराविक 6 मी. चे रस्ते 9 मी. करण्याचा घाटही हा ठराविक भागातील व्यवसायिकांसाठीच घालण्यात आला आहे. तातडीचा विषय म्हणून विनानिविदा कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आले आहे. यातून केवळ पैसा मिळवून आगामी महापालिका निवडणूक लढवणे हा भाजपचा उद्देश आहे. यासंदर्भात मी सातत्याने आवाज उठवायचा प्रयत्न करत आहे. परंतु यासाठी साधी पक्षाच्या नगरसेवकांची बैठकही बोलावली जात नाही. एक वर्षाने निवडणूक होणार आहे. पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी थांबवण्याबाबत ‘ काँग्रेस’ ची भुमिका काय आहे ? असा सवालच अरविंद शिंदे यांनी उपस्थीत केल्याने येत्या काळात काँग्रेस मध्ये ‘ खडाखडी ‘ होण्याची चिन्हे दिसत आहेत.