Pune News : पुण्यात ‘सैराट’ ! विश्रांतवाडी परिसरात वडिल आणि भावांकडून प्रियकरावर प्राणघातक हल्ला

पुणे (Pune) : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यात (Pune)  सैराटची पुनरावृत्ती झाली असून, बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून भावांनी व वडिलांनी प्रियकरावर प्राणघातक हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास धानोरी येथे ही घटना घडली आहे.

राजू गौतम भिसे (वय 25) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून, जखमी तरुणाची आई सुनीता भिसे यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष मोरे, जीवन परियार, प्रतीक ओव्हाळ व सुनील ओव्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू याचे प्रतिकच्या बहिणी सोबत प्रेम संबंध आहेत. याच कारणावरून हा वाद झाला. माझ्या बहिणीचा नाद सोडून दे असे सांगत प्रतीक आणि त्याच्या वडिलांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने राजू भिसे याला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. राजुला वाचविण्यासाठी मध्ये गेलेल्या त्याच्या आईला ही आरोपींनी मारहाण केली. यामध्ये राजू भिसे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.