Pune News : पानिपत योद्धे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांना दीपोत्सवातून मानवंदना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पानिपत युद्ध हे मराठयांच्या इतिहासातील अत्यंत महाभयंकर युद्ध होते. या घटनेला २६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने तसेच श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पर्वतीवरील पेशव्यांच्या समाधीस्थळ परिसरात ५०० दीप प्रज्वलित करण्यात आले. पानिपत योद्ध्यांच्या पराक्रमाचा आणि श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या सुशासनाचा जयजयकार करीत तरुणाईने हा पानिपत शौर्य स्मरण दिन साजरा केला.

इतिहास प्रेमी मंडळ आणि श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, महेंद्र पेशवा, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे, देवदेवेश्वर संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, हिंदुस्थानच्या इतिहासात अनेक मोठया घटना घडल्या. मात्र, त्यातील मराठी माणसाच्या मनावरची भळभळती जखम म्हणजे पानिपतचे युद्ध. दिनांक १४ जानेवारी १७६१ साली इतिहासातील हा महाभयंकर प्रसंग घडला. त्यामुळे याद्वारे पूर्वजांनी केलेला पराक्रम, इतिहास, त्याग, सामर्थ्य, जिद्द आणि प्रखर राष्ट्रवादाची उजळणी करण्याची गरज आहे. कौरव-पांडवांचे जसे मोठे युद्ध झाले, तसाच हा पानिपताचा हा रणसंग्राम होता. मराठी साम्राज्याचे मूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात आहे. त्यामुळे शिवरायांना, नानासाहेब पेशवे आणि सदाशिवभाऊ पेशव्यांना आपण यानिमित्ताने अभिवादन करायला हवे.