Pune News : सराईत गुन्हेगाराकडून 3 पिस्तुले अन् 3 काडतुसे जप्त, समर्थ पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समर्थ पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्यांच्याकडून ३ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहे. आकाश भगवान त्रिभुवन (वय २५, रा. राधा चौक, बालेवाडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीचे ३ गुन्हे दाखल आहेत.

समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते व त्यांचे तपास पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना सराईत गुन्हेगार आकाश त्रिभुवन हा बारणे रोडवर थांबला असल्याची माहिती मिळाली. या बातमीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त केले.

त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात त्याने आपल्याकडे आणखी पिस्तुल असल्याची कबुली दिली. त्याच्याकडे आणखी २ पिस्तुले व २ काडतुसे मिळाली. या प्रकरणात त्याच्याकडून एकूण ३ पिस्तुले व ३ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल मोहिते व व त्यांचे सहकारी हवालदार संतोष काळे, पोलीस शिपाई हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, शुभम देसाई, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सचिन पवार, निलेश साबळे, सुमित खुट्टे यांनी ही कामगिरी केली.