Pune News : सरस्वती शेंडगे यांचा उपमहापौर पदाचा राजीनामा; PMP चे संचालक शंकर पवार यांनाही राजीनामा देण्याची सूचना, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपने ‘भाकरी’ फिरविली !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा महापालिकेमध्ये सत्ता मिळविण्यासाठी भाजपने ‘रिपाइं’ सोबतच नाराजांची मनधरणी करण्यासाठी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा घेतला असून पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांनाही राजीनामा देण्याची सूचना देण्यात आली आहे. तर शेवटच्या वर्षात विविध विषय समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी अन्य पक्षांतून भाजपवासी झालेल्यांना संधी देण्याची तयारी केली आहे. यामुळे वर्षानुवर्षे विरोधात राहूनही कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात लढा देणार्‍या पक्षातील जुन्या जाणत्यांनाच ‘राखीव’ खेळाडू म्हणून केवळ सामना पाहाण्याची वेळ आळी आहे, असा टीकेचा सूर मूळ भाजपेयींकडून आळविण्यात येउ लागला आहे.

महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर १४ महिन्यांपुर्वी महापौरपदी मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड करण्यात आली होती. विशेष असे की या निवडीच्यावेळी उर्वरीत कालावधीत दोन्ही पदांचा कार्यकाल सव्वा वर्षांचा राहील, असेही भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, सव्वा वर्ष उलटल्यानंतर कोरोना काळात शहराचे चांगले नेतृत्व केल्याची पोचपावती म्हणून मोहोळ यांच्याकडेच पदभार ठेवण्यात आला. दरम्यानच्या काळात स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांना सलग तिसर्‍यांदा संधी देण्यात आल्याने, भाजपमधील इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. तर अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना कोरोना काळात सहा महिन्यांसाठी विविध पदांवर संधी देउन त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र, आज अचानक शेंडगे यांचा राजीनामा घेण्यात आला. तसेच पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांनाही संचालकपदाचा राजीनामा देण्याची सूचना देण्यात आली आहे. उपमहापौर पद मिळावे यासाठी रिपाइंने अगदी पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्फत भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे फिल्डिंग लावल्याची माहिती रिपाइं मधून देण्यात येत आहे. भाजपचे बोपोडी येथील नगरसेवक विजय शेवाळे यांच्या निधनामुळे रिक्त होणार्‍या जागेसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीमध्ये बोपोडीसारख्या भागातून रिपाइंची मदत लागणार असल्याने शेंडगे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. रिपाइंच्या गटनेत्या बोपोडी भागातूनच महापालिकेवर प्रतिनिधीत्व करत असून उपमहापौर पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार, असा विश्‍वास रिपाइं मधून व्यक्त करण्यात येत आहे.

पीएमपीचे संचालक यांचाही येत्या महिन्यांभरात राजीनामा घेउन त्या ठिकाणी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकिर यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. तापकिर या स्थायी समिती सदस्य असून त्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. परंतू ही संधी हुकल्याने मूळ भाजपच्या नगरसेवकांमध्ये चुकीचा संदेश जाउ नये, यासाठी तापकिर यांच्याकडे पीएमपीची जबाबदारी सोपविण्यात आल्याची चर्चा आहे. तर अन्य पक्षातून आलेल्यांना शेवटच्या वर्षात पुन्हा एकदा शहर सुधारणा समिती, क्रिडा समिती, विधी समिती आणि महिला बाल कल्याण समितीवर संधी देउन ‘मांडवाखालून’ काढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. आगामी निवडणुकीसाठीच्या या खेळामुळे मूळ भाजपच्या नगरसेवकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. मात्र, सध्यातरी ‘पक्षापुढे कोणी मोठा नाही’ या पक्षाच्या भुमिकेपुढे त्यांना ‘राखीव’ खेळाडू म्हणून या सामन्याकडे पाहाण्याशिवाय सध्यातरी गत्यंतर नाही, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यासाठी संधी आणि वेळही देण्यात आली होती. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही याबाबत चर्चा केली. पक्षाची भुमिका समजून घेतल्यानंतर त्यांनी आज राजीनामा दिला.

– गणेश बिडकर, सभागृह नेते, पुणे महापालिका