Pune News : तरूणांना गुंगीचं औषध देऊन लुटणार्‍या ‘सायली’ची युवकांमध्ये दहशत, आयटी इंजिनिअरला लुटलं, चंदननगरमध्ये FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वाकडच्या तरुणाला डेटिंग अपवरून हॉटेलात भेटण्यास बोलावल्यानंतर त्याला गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या त्या “सायलीने” पुण्यातील एका आयटी इंजिनिअर तरुणाला देखील अश्याच प्रकारे लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुण्यातही शॉकीन तरुणांमध्ये या सायलीची चांगलीच दहशत माजली आहे.

याप्रकरणी एका 33 वर्षीय तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार सायली नावाच्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार नोव्हेंबर 2020 मध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आहे. तो आयटी इंजिनिअर आहे. सध्या नोकरीच्या शोधात आहे. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात या तरुणाचा डेटिंग ॲपवरून ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने खराडी येथील एका लॉजमध्ये भेटण्यास बोलावले. तरुण तिला भेटण्यास गेला.

दोघे दारू पिणार होते. पण तरुणीने त्याला दारूत गुंगीचे औषध मिसळले. तो दारू पिल्यानंतर त्याला गुंगी आली. तो बेशुद्ध झाल्यानंतर या सायलीने त्याच्या गळ्यातील 45 हजार रुपयांची चैन चोरून नेली. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात घडल्यानंतर आता गुन्हा दाखल झाला आहे. त्या तरुणांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याने तक्रार दिली नव्हती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र वाकडला असाच प्रकार घडला आणि तो उघडकीस आल्यानंतर त्याला ही माहिती मिळाली. त्यानंतर त्याने धाडस करत गुन्हा दाखल केला आहे, असे कळते.

वाकड येथे देखील चेन्नईतील ३० वर्षीय आशिषकुमार नावाच्या तरुणाला लुबाडले आहे. त्याला शितपेयातूूून गुंगीचे औषध देऊन लुबाडले आहे. दरम्यान या सायलीने मात्र पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात चांगलीच दहशत माजवली आहे. त्यामुळे त्या सायलीला पकडणे पोलिसांसाठी आवाहन असणार आहे.