Pune News : पुण्यात 5 वी ते 8 वी पर्यंतची शाळा 1 फेब्रुवारीपासून – अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील 5 वी ते आठवीचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

राज्यात मिशन बिगेन अंतर्गत 27 पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार शाळातील दुरुस्तीची कामे व अन्य सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी वेळ लागत आहे. ही कामे युद्धस्तरावर सुरू असून 1 फेब्रुवारी पासून हे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायजर, हात धुण्यासाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहांची दुरुस्ती तसेच वर्गामध्ये बैठक व्यवस्थेत सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे. यासोबतच पालकांकडून संमतीपत्रक घेण्यात येणार आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील परवानगी देण्यात आली आहे. परंतु व्हॅन मध्ये कार प्रमाणेच 4 जणांना परवानगी राहील. तसेच बसमध्ये ही विदयार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखावे लागणार आहे. एक ट्रिप झाल्यानंतर व्हॅन आणि बस सॅनिटाइज करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यातरी विद्यार्थी शाळेत कसे जाणार याबाबत समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.