Pune News | सर्वंकष, दूरगामी विकासाचे शास्त्रशुद्ध नियोजन गरजेचे ! पुणे नगरविकास परिषदेत तज्ज्ञांचा सूर; देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेंद्र पठारेंचा पुढाकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि आयटी इंडस्ट्रीचे शहर यासह अन्य क्षेत्रातील वैशिष्ट्यांमुळे पुण्याची ओळख आहे. पुण्याकडे येणाऱ्यांचा लोंढा मोठा आहे. परिणामी शहर दिवसेंदिवस फुगत आहे. अशावेळी नगरासह उपनगरांचा विकास कळीचा मुद्दा आहे. सार्वजनिक वाहतूक, वीज आणि पाणी या मूलभूत पायाभूत सुविधांसह अन्य गोष्टींची उपलब्धता गरजेची आहे. बांधकामे होताहेत. पण पायाभूत सुविधा नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे या शहरात राहणार सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून नगरविकासाचे नियोजन गरजेचे आहे. विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धन यावरही लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर ‘पुणे नगर विकास परिषदे’त (पुणे अर्बन डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह) व्यक्त झाला. (Pune News)

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र पठारे यांच्या संकल्पनेतून पुणे नगरविकास परिषदेचे (पुणे अर्बन डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह) आयोजन करण्यात आले होते. पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या या परिषदेत पत्रकारिता, उद्योग, बांधकाम, शिक्षण, संशोधन, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून झाले.

 

‘टेक्नॉलॉजी फॉर अर्बन डेव्हलपमेंट, फ्युचर मोबिलिटी, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर’वर भाजपच्या पायाभूत सोयीसुविधा विभागाचे अध्यक्ष मंदार देवगावकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अधिष्ठाता प्रा. अर्चना ठोसर, ‘चितळे बंधू’चे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे, जावडेकर ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जावडेकर यांनी, तर ‘रोल ऑफ मीडिया इन पुणे अर्बन डेव्हलपमेंट’वर ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीधर लोणी, ‘पुढारी’चे निवासी संपादक सुनील माळी यांनी विचार मांडले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “पुढील पाच वर्षात पुण्याचा चेहरा बदललेला दिसेल. शहराच्या विकासात युवक सक्रिय भूमिका घेत आहेत, ही आनंदाची बाब आहे. नियोजनाला कृतीची, अंमलबजावणीची जोड आवश्यक आहे. शहराच्या विकासाचा विचार करताना सार्वजनिक स्वच्छतागृहे, वाहतूक यावरही अधिक भर हवा.”

 

जगदीश मुळीक म्हणाले, “शहराचा विकास म्हणजे पाणी, रस्ते, वीज एवढ्यावरच मर्यादित न राहता पुढचा विचार करावा. यासाठी केवळ सरकार किंवा यंत्रणेवर अवलंबून न राहता लोकांनी पुढे येऊन हातभार लावायला हवा. शहराच्या विकासात हातभार लावला तर त्यातून देशाचाही विकास होणार आहे. लोकसहभाग ही मोठी ताकद आहे.”

 

राजेश पांडे म्हणाले, “धोरण ठरले की त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आमचे असते. पण ही चर्चा केवळ चर्चेच्या पातळीवर न थांबता त्यातून निष्कर्ष निघून त्याचे अंमलबजावणीत रूपांतर झाले पाहिजे. पुण्याची खरी ओळख जपत दूरदृष्टी ठेवून विकासाचे नियोजन व प्रत्यक्ष कृती गरजेची आहे.”

 

परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सुरेंद्र पठारे म्हणाले,
“नगरविकासावर आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा विशेष भर आहे. त्यामुळे शहराच्या विकासात लोकांचा,
तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाची याहून अधिक चांगली भेट काय देता येईल,
असा विचार करून या परिषदेचे आयोजन करण्यात आले.”

प्रा. अर्चना ठोसर म्हणाल्या, “विकासाच्या दृष्टीने अनेक उपयोजित तंत्रज्ञान विकसित होताहेत.
विकासातील महत्वाचा मुद्दा सार्वजनिक वाहतूक असून त्यावर काम व्हावे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यात तंत्रज्ञान उपयुक्त असून,
ते अद्ययावत व सुलभ होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वाहनांचे ट्रॅकिंग, ऑटोमेशन, कार्बन न्यूट्रिलिटी यावर संशोधन सुरु आहे.
पर्यावरण संवर्धनावर भर दिला, तर आरोग्य सुधारेल.
एकूणच शहराची संस्कृती, परंपरा व वारसा जपत अद्ययावत तंत्र सुविधांनी सज्ज शहर हा शहराचा विकास असेल.”

 

नदी प्रकल्पाविषयी मंदार देवगावकर म्हणाले, “मुळा-मुठा नदी शहराचा आत्मा आहे. नदी सुधार प्रकल्पातून त्या सुरक्षित व सुशोभित करून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे. शहराच्या विकासासाठी पीएमआरडीए, महापालिका व स्मार्ट सिटी यांनी एकत्रित काम करावे. पर्यावरण व आरोग्य या विषयाकडे बारकाईने लक्ष द्यावे व लोकांनी यात सहभाग घेत स्वतःचे प्रश्न, मुद्दे मांडले, तर नागरविकासाचे नियोजन चांगले होईल.”

 

आदित्य जावडेकर म्हणाले, “शहर उपनगरांत खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नगरविकासासोबतच उपनगरांचाही विकास विचारात घेतला पाहिजे. बांधकाम होण्याआधी पायाभूत सुविधा उभारल्या जाव्यात. सार्वजनिक वाहतुक सक्षम व्हायला हवी. उपनगरातील लोकही पूर्णपणे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इच्छितस्थळी पोहोचतील तेंव्हा नगराचा विकास खऱ्या अर्थाने झाला असे म्हणता येईल.”

इंद्रनील चितळे म्हणाले, “पुण्यात आयटी क्षेत्रापेक्षा अधिक लोक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर अवलंबून आहेत. ‘एमएसएमई’ला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर त्यांच्या कामाचा व उत्पादनाचा दर्जा वाढेल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विकासाचे नियोजन केले, तर पुण्याची लोकसंख्या दोन कोटी झाली, तर त्याचा ताण शहराच्या नियोजनावर पडणार नाही.”

 

पत्रकारांच्या नजरेतून पुण्याचा विकास

“विकासाच्या व्याख्या संकुचित न ठेवता मोठ्या असाव्यात. जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्याचे ध्येय बाळगावे. स्थलांतर सर्वच क्षेत्रात होत आहे. जेव्हा चांगल्या सुविधा माझ्या शहरात मिळतील, तेव्हा विकास झाला असे म्हणता येईल. शहरातल्या सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सर्वंकष विकास करण्यावर भर हवा. त्यासाठी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सर्व स्तरांतून निर्माण होणाऱ्या समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर काय उपाययोजना करता येईल, याचा विचार केला पाहिजे.”

– सम्राट फडणीस, संपादक, सकाळ

“विकास हा एककल्ली नसावा. नुसते सिमेंटचे जंगल उभारले म्हणजे विकास होत नाही. त्यात पर्यावरण, निसर्गाचा विचार असायलाच हवा. शहराबरोबर सर्वसामान्य माणसाचाही विकास व्हायला हवा. परिघावरील भागांकडे, त्याच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यंत्रणेवर, नेत्यांवर, माध्यमांवर एकंदरीतच लोकांसाठी असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रावर लोकांचा दबाव असणे गरजेचे आहे. लोकांनी आवाज उठविणे, जाब विचारणे व त्यासाठी तेवढे आपलेपणा व जागरूकता असणे आवश्यक आहे. संधीसाधू राजकारण न करता व्यापक राजकारण करणे गरजेचे आहे.”

– संजय आवटे, संपादक, लोकमत

 

“पायाभूत सुविधा उत्तम हव्यात, नागरिकांना स्वतःची आर्थिक, सामाजिक व बौद्धिक भरभराट करण्याची संधी असावी,
उत्तम शिक्षण व आरोग्य मिळावे, आपल्या शहराबद्दलची ओढ कायम राहायला हवी. झोपडपट्टी पुनर्वसन व्हायला हवे.
याचे नियोजन तात्कालिक न करता पुढील २०-२५ वर्षांचे असावे. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाली,
तर पर्यावरणाचा प्रश्न सुटेल; आरोग्य सुधारेल. विकास घडून येण्यासाठी तरुणांनी राजकारणात यावे.
पण पदाच्या मागे न लागता तळागाळात काम करून लोकांचे प्रश्न, तज्ज्ञांची मते ऐकून घ्यायला हवीत.
त्यातून विकासाची दिशा ठरवता येते.”

– श्रीधर लोणी, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स

 

“शहरीकरणावर विकास ठरतो. पण त्या शहरीकरणाला शास्त्रशुद्ध नियोजनाची जोड असायला हवी.
नगरविकास हा नगर नियोजनावर अवलंबून असतो. आपण नियोजनात जिंकतो मात्र अंमलबजावणीत हरतो,
असे आजवरचे चित्र आहे. त्यामुळे नियोजनाबरोबरच योग्य अंमलबजावणीही आवश्यक आहे.
राजकारण वेगळे आणि पोट भरण्याचे साधन वेगळे असेल तरच जनहिताचे राजकारण घडू शकेल.
राजकारणाला उत्पन्नाचे साधन बनवले, तर भ्रष्टाचार वाढीस लागतो.
सामान्यातल्या सामान्य माणसाला शहरात राहणे सोयीचे आणि दिलासादायक वाटेल, तेव्हा शहराचा खरा विकास होतोय असे समजावे.”

– सुनील माळी, निवासी संपादक, पुढारी

 

 

Web Title :- Pune News | Scientific planning of comprehensive, far-reaching development is necessary! Experts’ voice in Pune Urban Development Council; Surendra Pathare’s initiative on the occasion of Devendra Fadnavis’ birthday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Shreerang Barne | मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितला, शिवसेनेने…; खा. श्रीरंग बारणेंनी सांगितलं शिंदे गटात जाण्याचे कारण

 

Salman Khan | गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, केली ‘ही’ मागणी

 

MLA Gulabrao Patil | ‘उद्धवसाहेबांना शाखेवर जावं लागतंय ही सगळ्यात वाईट परिस्थिती’ – गुलाबराव पाटील